काँग्रेस नेत्यांचा हिंदूद्वेष विशेषत: राम मंदिरावरचा राग नवा नाही. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राम मंदिर आणि रोजगाराचा संबंध जोडून प्रपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न केला. पण, काँग्रेसमध्ये राहून डाव्या विचारसरणीचा चष्मा लावलेल्या थरूर यांना मोदी सरकारने मागच्या एक दशकात केलेल्या लोककल्याणकारी कामांमुळे जी संतुष्टी मिळालेली आहे, ती कशी दिसणार?
दि. २२ जानेवारी रोजी भारतीय संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या अयोध्येतील भव्य अशा राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. ही घटना फक्त रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपुरतीच मर्यादित नव्हती, तर या प्राणप्रतिष्ठेतून भारतीय संस्कृतीच्या अस्मितेची हजारो वर्षांच्या संघर्षानंतर पुनर्स्थापना झाली. पण, ज्यांची आपल्या मातीशी आणि संस्कृतीशी मुळी नाळच तुटली आहे, त्यांना ना संस्कृतीशी देणेघेणे आहे, ना इथे राहणार्या लोकांच्या भावनांशी. म्हणूनच ही मंडळी हिंदू धर्माशी संबंधित कोणतीही गोष्टीला विरोध करण्याचा एककलमी कार्यक्रम इमानेइतबारे चालवतात. याचं विरोधातून मंदिरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला काय फायदा? असे प्रश्न ही मंडळी विचारत असतात. तर काही याच्याही पुढे जाऊन राम मंदिराच्या जागेवर रुग्णालय बांधण्याचा सल्ला देऊन टाकतात. याला शरीराने काँग्रेसमध्ये आणि मनाने डाव्यांसोबत असणारे शशी थरूरही अपवाद नाहीच म्हणा...
पुण्यातील एका सभेत बोलताना शशी थरूर यांनी “रोजगार मिळाला नाही, ते मंदिराने संतुष्ट होणार का?” असा खोचक प्रश्न उपस्थित केला. थरूर यांना उच्चविद्याविभूषित नेता मानलं जातं. भारताच्या परराष्ट्र सेवेपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी कामही केले आहे. त्यामुळे ते तरी मंदिर आणि रोजगाराची सांगड घालणार नाहीत, अशी अपेक्षा होती. ’मी हिंदू का आहे’ हे सांगण्यासाठी जवळपास ५०० पानांचे पुस्तक लिहिणार्या थरूर यांना मंदिरात रोजगार मागण्यासाठी नाही, तर अध्यात्मिक शांतीसाठी जातात, एवढी साधी गोष्ट माहित नाही. तसं पाहिलं तर थरूर बरोबरचं बोलले, बेरोजगार व्यक्तीला मंदिरात जाऊन संतुष्टी मिळण्याची शक्यता कमीच. त्यामुळेच की काय, मागच्या एका दशकापासून सत्तेत नसल्यामुळे बेरोजगार झालेली काँग्रेस राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाली नाही. बहुतेक त्यांच्यावर जनतेने लादलेल्या बेरोजगारीमुळे आलेले नैराश्य रामललाच्या दर्शनाने जाणारे नव्हते.
पण, थरूर यांना समजले पाहिजे की, मागच्या दशकात भारतीय संतुष्ट आहेत. म्हणूनच तर दोन वेळा भाजपला स्पष्ट बहुमत देणारे मतदार तिसर्यांदा भाजपला सत्ता सोपवतील, असा अंदाज सर्वच सर्वेक्षणांतून वर्तविला जात आहे. थरूर यांनी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, हे मतदार फक्त मोदींनी राम मंदिर बांधलं म्हणून किंवा काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवलं म्हणून मतदान करत नाहीत. तर, ते मतदान करतात कारण, मोदींनी सत्तेवर येताच देशातील ५० कोटींपेक्षा अधिक जनतेला पहिल्यांदा बँकिंग व्यवस्थेशी जोडलं. सरकारी योजनांचा लाभ दलालांमार्फत नाही, तर थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला, म्हणून भारतीय मतदार संतुष्ट आहेत.
भारतीय मतदार मोदींना मतदान करतात कारण, मोदींनी अनेक संकटांना दूर करत देशाला ऑनलाईन व्यवहारांमध्ये पहिल्या क्रमांकावर नेले. संपुआ सरकारच्या एक दशकाच्या कार्यकाळात देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर फक्त १२.४ लाख कोटींचा खर्च करण्यात आला. याउलट मोदींच्या नेतृत्वातील रालोआ सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भांडवली खर्चासाठी १०.१ लाख कोटींची तरतूद केली. मागच्या दहा वर्षांत देशात एक्सप्रेस वेचे जाळे विस्तारले. त्यासोबतच ’वंदे भारत’सारख्या अत्याधुनिक ट्रेन, छोट्या शहरांमध्ये ‘एम्स’सारख्या सर्व सुविधायुक्त हॉस्पिटलची निर्मिती या काळात करण्यात आली. गावांना शहरांसोबत जोडण्यासाठी ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’चा विस्तार करण्यात आला. म्हणून हे भारतीय मतदार संतुष्ट आहेत.
राहिली गोष्ट रोजगाराची, तर मागच्या सात ते आठ वर्षांत भारतात एक कोटी नवीन रोजगार निर्मिती झाली आहे, अशी माहिती ‘आयएमएफ’चे माजी कार्यकारी संचालक सुरजित भल्ला यांनी नुकतीच दिली आहे. या आकड्यांची तुलना संपुआ सरकारच्या कार्यकाळाशी केल्यास यामध्ये जमीन- आस्मानाचा फरक आहे. मोदींनी सत्तेत येताच ‘मेक इन इंडिया’, ‘मेड इन इंडिया’ यांसारख्या योजना आणून जगभरातील कंपन्यांना भारतात येऊन उद्योग स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
केंद्र सरकारने ’प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ (पीएलआय) या योजनेच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ला हातभार लावला. आज ’पीएलआय’ योजनेच्या माध्यमातून १४ क्षेत्रांतील उद्योगांना १.९७ लाख कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. यातून देशात उद्योगधंदे उभारण्यात आले. रोजगाराची निर्मिती झाली. त्यामुळे भारतीय मतदार मोदींच्या कारभारावर संतुष्ट आहेत. थरूर रोजगाराची आणि राम मंदिराची सांगड घालून प्रपोगंडा करण्याचा प्रयत्न कर आहेत, त्या थरूर यांनी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या संघटनेचा अहवाल वाचायला हवा होता. या संस्थेच्या अहवालानुसार, रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी देशभरात १ लाख २५ हजार कोटींची उलाढाल झाली. आता यातून किती रोजगार निर्मिती झाली असेल, हे थरूर यांना वेगळं सांगण्याची गरज नाही.
आज भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुसाट धावणार्या रेल्वेला मंदिरावरील आधारित उलाढालीचे इंजिन लागले आहे. पण, थरूर यांनी हे सगळं डाव्या विचारसरणीचा चष्मा उतरल्याशिवाय दिसणार नाही. त्यांनी हा चष्मा उतरून पाहिलं, तर त्यांना विकसित भारताचे चित्र पाहून नक्कीच संतुष्टी मिळेल!