"धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबद्दल दाखवलेलं सगळं खोटं!"
मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट
06-May-2024
Total Views |
मुंबई : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबद्दल दाखवलेलं सगळं खोटं आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सगळं खरं समोर येईल, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. सोमवारी ठाण्यातील महायूतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे राजन विचारेंना सभागृह नेतेपदाचा राजीनामा द्यायला सांगतात आणि ते स्वत: येऊन राजीनामा देतात, असं दाखवलं होतं. पण राजन विचारेंबद्दल चित्रपटात सगळं खोटं दाखवलं आहे. दुसऱ्या सिनेमात आम्ही सगळं खरं दाखवणार आहे. त्यांना दिघे साहेबांनी राजीनामा द्यायला सांगितला. पण त्यांनी दिला नाही."
"ते रघुनाथ मोरेंकडे गेले आणि त्यांना म्हणाले की, हे काय चालू आहे? माझं पद काढून घेत आहेत. मोरे साहेब खूप समजुतदार होते. ते म्हणाले की, दिघेंनी काही निर्णय घेतला असेल तर तो जाणीवपूर्वक घेतला असेल. विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तू बिलकुल इकडे तिकडे काही बोलू नको. पण तो दिघे साहेबांनाही नको नको ते बोलला. मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं की, असं करू नका. तेव्हा साहेबांनी त्याला बोलवून त्यांच्या भाषेत समजावलं. हे करावं लागलं. सिनेमात दाखवलेलं सगळं उलटं आहे. त्यांला चांगला दाखवला आहे. पण तो चांगला नाही," असा खुलासा त्यांनी केला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात महायूतीकडून शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीने उबाठा गटाचे नेते राजन विचारे यांना तिकीट दिले. त्यामुळे यावेळी ठाण्यात शिवसेना विरुद्ध उबाठा अशी थेट लढत रंगणार आहे.