ठाकरेंच्या अडचणी वाढणार! 'त्या' पत्रकार परिषदेची निवडणूक आयोगाकडून दखल
31-May-2024
Total Views |
मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला ठाकरेंची पत्रकार परिषद तपासण्याबाबत पत्र लिहिले आहे.
दि. २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादिवशी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. तसेच निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
यावर आशिष शेलार यांनी तीव्र आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ठाकरेंनी खोटी व दिशाभूल करणारी विधाने करीत आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत नेमके काय झाले, याची माहिती सादर करावी, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर केला आहे. हा मसूदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्याचा अभ्यास सुरू असून, आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का, हे पडताळले जात आहे. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील प्रत्येक शब्द तपासणार असल्याचे सांगण्यात येत आहे.