काँग्रेस नेते 'शशी थरूरां'चा पीए निघाला सोन्याचा तस्कर? सीमाशुल्क विभागाने रंगेहाथ पकडले

    30-May-2024
Total Views |
 shashi tharoor
 
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार शशी थरूर यांचे स्वीय सहाय्यक शिवकुमार यांना सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने बुधवार, दि. २९ मे २०२४ संध्याकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-३ वर त्याच्यावर कारवाई केली.
 
सीमाशुल्क विभागाने शिवकुमारला पकडले त्यावेळी तो दुबईहून परतला होता आणि परदेशातून परतलेल्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून सोने हस्तांतरित करत होता. दरम्यान, शिवकुमारला अटक करण्यासाठी सीमाशुल्क विभागाने स्वतःहून कारवाई केली. एएनआय या वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक शशी थरूर यांचा पीए आहे. त्यांच्याकडून एकूण अर्धा किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
 
 
वृत्तानुसार, शिव कुमार त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून जे सोनं घेत होता त्याची किंमत ५५ लाख रुपये होती. विमानतळावरील ग्रीन चॅनलवर कस्टम विभागाने त्याला पकडले आणि या सोन्याबाबत विचारणा केली असता, तो कोणतीही ठोस माहिती देऊ शकला नाही. यानंतर त्याला अटक करण्यात आली. याआधीही दिल्ली विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या अशा घटना अनेकदा समोर आल्याची माहिती आहे.
  
गेल्या आठवड्यातही कस्टम्सने सोन्याच्या तस्करी प्रकरणी ५ उझबेक नागरिकांना अटक केली होती. सर्व आरोपी दुबईहून येत होते आणि देशांतर्गत टर्मिनलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सीमाशुल्क विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आणि ते अधिक सतर्क झाले. या दक्षतेमुळे शिवकुमारचीही चौकशी केली असता त्याने विहित मर्यादेपेक्षा जास्त सोने घेतल्याचे निष्पन्न झाले.