पुणे : पुणे अपघातातील मुख्य आरोपी वेदांतचे ब्लड सँपल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर अशी त्यांची नावं आहेत. यासोबतच तिथला शिपाई अतुल घटकांबळे यालासुद्धा निलंबित करण्यात आले आहे.
१९ मे रोजी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात अपघातातील अल्पवयीन आरोपी वेदांतचे ब्लड सँपल घेण्यात आले होते. परंतू, ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांनी आरोपीचे ब्लड सँपल कचरा पेटीत टाकून दिले आणि त्याऐवजी एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सँपल घेऊन त्यावर आरोपीचे नाव लिहून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. डॉ. अजय तावरे हे फॉरेन्सिक मेडिकल विभागाचे प्रमुख आहेत तर डॉ. श्रीहरी हळनोर वैद्यकीय अधिकारी आहेत.
त्यादिवशी रात्री औंधमधील सरकारी रुग्णालयात डीएनए मँचिंगसाठी अल्पवयीन आरोपीचे दुसरे ब्लड सँपल घेण्यात आले होते. यावेळी आरोपीच्या वडिलांचेही ब्लड सँपल घेतले होते. त्यानंतर मिळालेल्या रिपोर्टनुसार, औंधमधील सँपल वडिलांसोबत मॅच झाले. परंतू, ससून रुग्णालयातील सँपल मॅच झालेले नाही. त्यामुळे ते तिसऱ्याच व्यक्तीचे सँपल असल्याचे स्पष्ट झाले. ब्लड सँपल बदलण्यासाठी आरोपीचे वडिल विशाल अग्रवालने अजय तावरेंना १४ वेळा फोन कॉल केले होते. या कामासाठी त्यांनी तब्बल ३ लाख रुपये घेतले होते.
दरम्यान, हे बदलेले ब्लड सँपल आरोपी वेदांतची आई शिवानी अग्रवाल यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतच्या तपासासाठी शिवानी अग्रवाल यांचे ब्लड सँपल घेण्यात येणार आहे. हे ब्लड सँपल मॅच झाल्यास त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.