आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणातील फरक समजेनासा झाला म्हणजे, अंधारे, राऊत, आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांची पिलावळ पैदा होते. ज्यांना राज्याच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीची काही माहिती नाही, असे हे नेते केवळ राजकीय लाभासाठी बेछूट आरोप आणि कृती करताना दिसतात. अन्यथा, डॉ. आंबेडकर यांनी घटनेत महिलांना संपत्तीतील वाटा देताना ज्या परंपरेचा आधार घेतला, तिचा मनुस्मृतीत उल्लेख केला आहे, हे त्यांनी लक्षात ठेवले असते.
शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे अडचणीत आले आहेत. महाड येथे मनुस्मृती फाडण्याचा उपद्व्याप त्यांच्या अंगाशी आला आहे. कारण, त्यांनी जे पोस्टर फाडले, त्यावर राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता. तो फोटोही आव्हाड यांनी फाडला. त्यामुळे त्यांच्यावर राज्यातून सार्वत्रिक टीका होत आहे. आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला, तरी त्यामुळे त्यांची या अपराधातून सुटका होणार नाही. प्रभू श्रीराम मांसाहारी होते का? याची नस्ती उठाठेव करणार्या आव्हाड यांनी, डॉ. आंबेडकर यांचा फोटो फाडून आपल्याला त्यांच्या विचारांशी काही देणे-घेणे नसल्याचेच सिद्ध केले आहे. शालेय अभ्यासक्रमात उदाहरणादाखल मनुस्मृतीतील काही श्लोक नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे कथित धर्मनिरपेक्षवाद्यांना एक कोलितच मिळाले आहे. अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याची टीका, त्यांनी सुरू केलीच होती. आता विद्यार्थ्यांना मनुवादी करण्यात येत असल्याची, भंपक टीका त्यांनी केली आहे. या श्लोकांना वगळण्यात यावे, या मागणीसाठी महाड येथे एक आंदोलन करण्यात आले, त्यात आव्हाड यांनी मनुस्मृतीची पाने फाडली. पण, ते करताना त्यावर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोही त्यांनी फाडला. या आंदोलनातून आव्हाड यांना केवळ राजकारण करायचे होते. पण हेतू शुद्ध नसतील, तर आपल्या कृतीचे विपरित परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात याचा अनुभव त्यांना आता येत आहे.
ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव हे नेते उठताबसता घेतात, त्या डॉ. आंबेडकर यांनीही देशाची राज्यघटना बनविताना, महिलांना संपत्तीत समान वाटा देण्यासाठी मनुस्मृतीतील तत्त्वांचा आधार घेतला होता. ही गोष्ट स्वत: बाबासाहेबांनीच लिहून ठेवली आहे. पण, ही गोष्ट या आव्हाड यांना ठाऊक असण्याचे कारणच नाही. कारण, ना त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या लेखनाचा अभ्यास केला आहे, ना मनुस्मृतीचा. ज्यांना केवळ सोयीस्कर राजकारण करायचे आहे, त्या आव्हाडांसारख्यांकडून विवेकपूर्ण वर्तनाची अपेक्षाच ठेवता येणार नाही. महाराष्ट्रात गेल्या तीन-चार वर्षांत, अशा उठवळ नेत्यांना महत्त्व आले आहे. महापालिका निवडणुकीतही निवडून येण्याची क्षमता नसलेल्या, संजय राऊत यांच्यासारख्या उपटसुंभांना त्यांच्या हुजरेगिरीमुळे आज राज्यसभेचे सदस्यपद मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी शिंदे यांनी, राज्यातील मतदारसंघात मतदारांना 25 ते 30 कोटी रुपये वाटल्याचा आरोप, राऊत यांनी आपल्या लेखातून केला आहे. इतकेच नव्हे, तर अजितदादा पवार यांच्या उमेदवारांना पाडण्यासाठीही प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी आपल्या स्तंभातून केला असून, तो आता त्यांना चांगलाच भोवणार आहे. कारण, मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला भरण्याची नोटीस बजावली आहे. त्यांनी तीन दिवसांत जाहीरपणे लेखी माफी न मागितल्यास, त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला भरण्याची धमकी शिंदे यांनी दिली आहे.
गेले दोन वर्षे राऊत आणि त्यांच्या पक्षातील गणंग, हे शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांबद्दल वाटेल ते अपशब्द उच्चारत होते. रस्त्यावरून जाताना विनाकारण भुंकणार्या बेवारशी कुत्र्याकडे, लक्ष न देणे हाच शहाणपणा असतो. त्यानुसारच शिंदे व त्यांचे सहकारी, हे राऊत यांच्या या बेताल वक्तव्यांकडे आजवर दुर्लक्ष करीत आले होते. पण, आता राऊत यांनी सर्व मर्यादा पार केल्यामुळे आणि निवडणुकीतील विजयासाठी पैसे वाटल्यासारखा गंभीर आरोप केल्यावर, त्यांना त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे होते. नितीन गडकरी, अरुण जेटली, यांच्यासारख्या मान्यवर नेत्यांनी आपल्यावर बेजबाबदार आरोप करणार्या, अरविंद केजरीवाल यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता. तेव्हा प्रत्येक वेळी केजरीवाल यांना, जाहीरपणे माफी मागावी लागली होती. त्यांचाच आदर्श शिंदे यांनी ठेवला असून, आता राऊत यांच्यावर बदनामीच्या कायद्याखाली कठोर कारवाई केली जाईल, हे सूचित केले आहे. मध्यंतरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊत यांच्यावर ते गांजा पिऊन लेख लिहितात, अशी टीका केली होती. ती खरीच आहे, हे त्यांच्या ताज्या लेखावरून स्पष्ट होते. राऊत हे सध्या लंडनमध्ये असून, तेथे खूप चांगले मानसोपचारतज्ज्ञ आहेत, तेव्हा राऊत यांनी तेथे आपल्यावर उपचार करून घ्यावेत, असेही फडणवीस म्हणाले होते.
महाराष्ट्रात अशा उथळ पण निर्लज्जपणे, विधाने करणार्या नेत्यांची पैदास वाढत चालली आहे, ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल. अशा उठवळ नेत्यांमध्ये काही महिला नेत्यांचाही समावेश आहे, ही अधिकच खेदाची गोष्ट आहे. त्यापैकी एक आहेत, सुषमा अंधारे नावाच्या आक्रस्ताळ्या महिला नेत्या. पुरुषही वापरणार नाहीत, अशी भाषा त्या जाहीर व्यासपीठावरून वापरताना दिसतात, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची चिंता वाटू लागते. अंधारे यांनी आपल्या भाषणांतून आजवर ’श्रीराम-सीता’ यांच्यासारख्या देवतांवरही, अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. ती भाषा आम्ही येथे वापरू शकत नाही. पण निव्वळ निवडणुकीतील प्रचारात मते मिळविण्यासाठी, समाजातील श्रद्धेय व्यक्तिमत्त्वांवर आणि देवतांवर टीका करणे म्हणजेच आक्रमकता अशी समजूत या अंधारेबाईंची झाली आहे. त्यांना ना तत्त्वांशी काही देणे-घेणे, ना राजकीय विचारधारेशी. अनेक पक्षांमध्ये फिरून आल्यावर, त्या सध्या उबाठा सेनेत कार्यरत आहेत. त्या सेनेलाही राऊत आणि अंधारे यांच्यासारख्या नेत्यांचीच गरज भासते, यावरून त्या सेनेचा वैचारिक स्तर काय आहे, त्याची कल्पना केलेली बरी. अंधारे असोत की राऊत किंवा आव्हाड, या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी असे कोणते भरीव योगदान दिले आहे? महाराष्ट्रातील जनतेच्या आशा-आकांक्षा काय आहेत, याची या नेत्यांना माहिती आहे काय? प्रतिपक्षावर टीका करताना सर्व मर्यादा सोडून बोलणे, म्हणजेच सडेतोड टीका अशी बालीश समजूत आहे. संत तुकाराम महाराजांनी अशा व्यक्तींसाठी ‘तुका म्हणे ऐशा नरा’ हे जे म्हटले आहे, तेच खरे.