मुंबई : सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर हे चमकू नेते आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनी केली आहे. पुणे अपघात प्रकरणात अंधारे आणि धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर आता सुरज चव्हाण यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
सुरज चव्हाण म्हणाले की, "प्रशासन आपलं काम करत आहे आणि सरकार त्यांना मार्गदर्शन करत आहे, ही गोष्ट सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांनी लक्षात ठेवावी. पण सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांना माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत असल्याने रोज उठून कुठल्यातरी ऑफिसमध्ये जाऊन ते आंदोलन करत आहेत. ते किती धुतल्या तांदळाचे आहेत हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आम्हाला सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांचा इतिहास माहिती आहे. त्यांनी फक्त आम्हाला खोलात जायला लावू नये."
"आपण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहोत. पण महाराष्ट्रात सध्या फक्त एकच प्रश्न असल्याचं वाटत आहे. त्यांनी दुष्काळावर बोलावं. पण जिथे प्रसिद्धी मिळते फक्त तिथेच बोलायचं आणि चमकायचं काम ते करत आहेत. ते चमकू नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा काहीही फरक पडणार नाही. सरकार दोषींवर कडक कारवाई करेल. या नौटंकीबाजांनी रस्त्यावर कितीही नौटंकी केली तरी जनता त्यांना दाद देणार नाही," असे ते म्हणाले.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या बाई!
पुणे अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या आरोपांनाही सुरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "अंजली दमानियांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यांना कोणी कोणी कॉल केलेत आणि हल्ली त्या कुणाच्या सांगण्यावरून आरोप करायला लागल्या आहेत हे माहिती करण्यासाठी त्यांचे कॉल रेकॉर्डिंग चेक व्हायला हवे. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या नाहीत तर त्या रिचार्जवर चालणाऱ्या बाई आहेत. त्यांना कुणी सुपारी दिली की, ती सुपारी वाजवण्याचं काम त्या करतात. दमानियांकडे पुरावे असतील तर त्यांनी बोलावं उगाच प्रसिद्धी मिळते म्हणून मोठमोठ्या लोकांवर बोलू नये," असेही ते म्हणाले.