मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज (२८ मे) १४१ वी जयंती. आणि याच निमित्ताने अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने सेल्युलर जेलला भेट दिऊन सावरकरांना वंदन केले. सध्या रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांनीही त्याच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.
रणदीपने सेल्युलर जेलला सपत्नीक भेट देत म्हटले की, “वीर सावरकरांची कथा वाचताना आणि ती पडद्यावर आणताना मी त्या कहाणीत खूप गुंतलो. वीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वाला जाणून घेणाऱ्या लोकांकडून जेव्हा माझं कौतुक होतं तेव्हा खूप छान वाटतं. त्यांची कथा मी खूप चांगल्या आणि दमदार पद्धतीने मोठ्या पडद्यावर आणली आहे. आज आम्ही इथे सेल्युलर जेलमध्ये आलो आहोत, जिथे विनायकजींना शिक्षा झाली होती. ५० वर्षे जन्मठेपेची शिक्षा...सर्व शक्तिशाली क्रांतिकारकांना इंग्रजांनी देशापासून दूर एकांतात ठेवले होते. हेच ते ठिकाण आहे...'
दरम्यान, काही दिवसांपुर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचं वितरण करण्यात आले. याचा मानकरी अभिनेता रणदीप हुड्डा ठरला होता. यावेळी त्याने आजवर लोकांपर्यंत सावरकरांचे विचार पोहोचले नाहीत याची खंत आणि राग आल्यामुळे त्या रागात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट केला अशी कबूली दिली होती.