राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा हल्लाबोल !
28-May-2024
Total Views |
ठाणे : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांनी पोलीस आयुक्तांना फोन करुन सक्त कायदेशीर कारवाईचे, राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिले असतानाही जितेंद्र आव्हाड यांना स्वप्नात अजितदादाच दिसतात, कायम एका द्वेषाने ते अजितदादांबद्दल बोलत असतात. स्वतःच ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पहावे वाकून ही आव्हाड यांची प्रवृत्ती आहे. असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी करून याच आव्हाडांसाठी अजितदादांनी दोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे आव्हाड विसरलेले दिसतात. असा टोलाही त्यांनी लगावला.
पुणे अपघात प्रकरणावरून विरोधकांकडुन महायुतीतील नेत्यांवर आरोप केले जात आहेत. यात आव्हाड आघाडीवर असतात.अजितदादांनी पुणे पोलीस आयुक्तांना किती वेळा फोन केला, काय बोलले याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी आव्हाडांनी केली. याचा खरपुस समाचार आनंद पराजपे यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत घेतला.
आव्हाड यांना तर स्वप्नात कायम अजितदादाच दिसतात. येनकेनप्रकारेन अजितदादांशी संबंध जोडायचा अजितदादांवर कशी टीका करता येईल, हाच आव्हाडांचा केविलवाणा प्रयत्न असतो. असा हल्लाबोल परांजपे यांनी करून आव्हाडावर मुंब्यात ३५४ गुन्हा दाखल झाला तेव्हा तसेच हरहर महादेव चित्रपटावेळेस दाखल झालेल्या गुन्हयावेळेस याच अजितदादांनी तुमच्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केले होते. याचीही आठवण परांजपे यानी करून दिली.
आव्हाड बरळले ...ती पकपक सोनिया दुहान काय इंदिरा गांधी आहे
शरद पवारांची साथ सोडुन राष्ट्रवादी (अजितदादा) गटासोबत जाण्याच्या वाटेवर असलेल्या सोनिया दुहान यांच्याबद्दल माध्यमांनी आव्हाडांना प्रश्न केला असता बोलताना आव्हाडांची जीभ घसरली. ती पकपक सोनिया दुहान काय इंदिरा गांधी आहे का ? असे आव्हाड म्हणताना दिसत आहेत.
कोकण पदवीधर निवडणूकीत महायुतीसोबत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्ये सत्तेत आहे. यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल, त्याच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे राहून, त्याचे काम करु. असे आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.