धावण्याचे वेड सगळ्यांनाच असते, पण आपल्या वेडालाच आपले जीवनध्येय बनवत, प्रचंड मेहनतीच्या जोरावर अचाट कामगिरी करणार्या अदिती परब हिच्याविषयी...
खेळ हा साधरणपणे फावल्या वेळात करायचा उद्योग, अशी एक साधारण समजूत असते. शाळेतदेखील अनेकदा खेळाचे तास, इतर विषयांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वापरले जातात. त्यात आता लहान मुलांच्या हातात मोबाईल आल्याने, मैदानी खेळ हा प्रकार कमीच झाला आहे. त्यामुळे खेळात करिअर करायचे, हा विषय सामान्य माणसाच्या ध्यानी येणे तसे दुरापास्तच. पण, दादरमधील एका सामान्य मराठी कुटुंबात जन्मलेली अदिती मात्र याला अपवाद ठरली. लहानपणापासूनच वेगाचे आकर्षण असलेल्या अदितीला जोरात धावायला आवडायचे. अदितीने दहावीपर्यंतचे शिक्षण डी. ए. व्ही. पब्लिक शाळेतून पूर्ण केले. लहानपणापासून असलेले वार्याशी स्पर्धा करत धावण्याचे वेड, अदितीला शाळेतदेखील स्वस्थ बसू देईना. इयत्ता चौथीमध्ये असताना शाळेतील एका धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अदितीने हट्ट धरला. पण, ती स्पर्धा पाचवीपासून पुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीच होती. पण, अदितीचा आत्मविश्वास प्रचंड होता. स्पर्धेत भाग घ्यायचाच, हा आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी ती दुसर्या दिवशी आपल्या वडिलांना घेऊन शाळेत आली. त्यावेळी तिच्या क्रीडाशिक्षकांनी “पाचवीच्या एका मुलीला जर हरवलेस, तर मी तुला स्पर्धेत भाग घेऊ देईन,” अशी अट ठेवली. हेच अदितीचे धावपट्टीवर पडलेले पहिले पाऊल.
त्या स्पर्धेत आपल्यापेक्षा एका वर्षाने मोठ्या असलेल्या खेळाडूचा पराभव करत अदितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मग मात्र अदितीने मागे वळून पाहिलेच नाही. या विजयानंतर अदितीने या खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. मात्र, दुसरीकडे अदितीने शिक्षणावरील आपले लक्ष ढळू दिले नाही. दरम्यानच्या काळात, अदितीने वझे-केळकर महाविद्यालयातून ‘इंग्रजी साहित्य’ या विषयात पदवी संपादन केली. सध्या ती ‘मीडिया आणि मार्केटिंग’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. पण, हे सगळे करत असताना, अदितीने जे साध्य केले, ते तिची ध्येयासक्ती ठळकपणे अधोरेखित करणारेच. वयाच्या १३व्या वर्षीच शाळेतून राष्ट्रीय पातळीवर खेळताना अदितीने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये राष्ट्रीय विक्रमदेखील नोंदविला. मग एकदा विश्वास मिळाल्यावर अदितीने प्रगतीचा वेग कमी केला नाही.
अदितीचे वयवर्ष फक्त २१. यादरम्यान जिंकलेल्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विशेष लक्षात राहिलेल्या स्पर्धेबाबत सांगताना, “एकदा २०० मीटरचे अंतर, अदितीने फक्त ०.२५ सेकंदात पार केले होते. त्यावेळी देशाची प्रसिद्ध धावपटू असणार्या पी. टी. उषा यांनी उभे राहून टाळ्या वाजवित अदितीचे कौतुक केले होते,” असे अदिती सांगते. एवढ्या कमी वेळेत अंतर पार करून अदितीने तेव्हासुद्धा राष्ट्रीय विक्रमच केला होता. आजवर अदितीने धावण्याच्या अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असून, दहाच्या वर राष्ट्रीय सुवर्णपदकांची अचाट कामगिरी तिने साध्य केली आहे. अदितीला तिच्या अंगीभूत गुण आणि मेहनतीमुळे ‘गेल इंडिया’ सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी प्रायोजकत्वसुद्धा दिले आहे. याच सगळ्याच्या माध्यमातून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धावपटू आणि विक्रमवीर उसेन बोल्ट यांचे मार्गदर्शनदेखील अदितीला लाभले. ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेतदेखील ‘रिले’ या क्रीडाप्रकारात अदितीने सुवर्णपदकाची कमाई केली.
आज अदितीने आपले उद्दिष्ट स्पष्ट ठेवले आहे. ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक अडचणी येतातच. अदितीचे संपूर्ण कुटुंब या सगळ्या प्रवासात तिच्यामागे, भक्कमपणे उभे राहिले. एक खेळाडू म्हटले की, यशापेक्षा दुखापतीच जास्त होतात. त्यामुळे या काळात खेळाडूला शारीरिक तसेच मानसिक आधाराचीही तितकीच गरज असते. या सगळ्यांत तिचे कुटुंब कमी पडले नाही, याचे विशेष कौतुक करावेच लागेल. मध्यंतरीच्या काळात अदितीला काही दुखापतींमुळे सात ते आठ महिने मैदानापासून दूर राहावे लागले. या काळातदेखील मानसिक कणखरता टिकविण्यात तिच्या घरच्यांनी मदत केल्याचे अदिती सांगते. तसेच, आवश्यक सगळ्या त्या गुणांचा अंगीकार करून स्पधेर्र्ला सिद्ध करण्यासाठी अदितीचे गुरू खूप मेहनत घेतात आणि दक्षदेखील असतात, असे अदिती विशेषत्वाने नमूद करते.
“जेव्हा जेव्हा एखादे पदक मिळते, तेव्हा तेव्हा माझ्या बाबांनी मला आनंदाने मारलेली मिठी आणि लेकीच्या पराक्रमाने वडिलांच्या डोळ्यांत तरळलेले आनंदाश्रू माझ्यासाठी सर्वकाही आहे,” असे अदिती सांगते. पण, हे सगळे यश साध्य करण्यासाठी अनेक आनंदांवर पाणी सोडावे लागत असल्याचेही अदिती नमूद केले. आजही अदिती दररोज आठ तास मैदानावर मेहनत घेते. यासाठी तिला दररोज रात्री ९.३० वाजता निद्रादेवीची आराधना करावीच लागते. त्यामुळे उशिरापर्यंत जागून, मोबाईलवर संभाषण करणे, जवळपास दुरापास्तच होऊन बसते. पण, त्याचे कोणतेही शल्य नसल्याचेदेखील अदिती सांगते. देशातील अनेक खेळाडू अशीच मेहनत घेत आहेत. खेळाडूंसाठी असलेल्या सुविधांमध्ये वाढ होत असली, तरी अजूनही त्या सुविधा हव्या तितक्या अद्ययावत नाहीत, अशी खंतदेखील अदिती व्यक्त करते. मात्र, या सगळ्याच्या पुढे जाऊन, देशासाठी पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न अदितीने बाळगले असून, दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून तिच्या सुवर्णस्वप्नांच्या पूर्ततेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!