अंजली दमानियांच्या आरोपांवर अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, "मी कुणाला..."

    28-May-2024
Total Views |
 
Ajit Pawar
 
मुंबई : मी कुणालाही पाठीशी घालत नाही. उलट अजित पवार दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, असे माझे शब्द असतात, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले आहे. पुणे अपघात प्रकरणात अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप केले होते. यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मी लोकप्रतिनिधी आणि राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली आणि आम्हाला कुणीतरी याबद्दल सांगितलं तर ती घटना शहरातील असेल तर पुणे आयुक्तांना आम्ही सांगतो. पिंपरी-चिंचवडमधील असेल तर तिथल्या आयुक्तांना आम्ही सांगतो. कारण तेच प्रमुख आहेत. आम्ही शिपायाला, पीआयला आणि एपीआयला फोन करण्याचं काहीच कारण नाही. मी तिथल्या पोलिस प्रमुखालाच सांगेन आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा प्रमुखाला सांगेल."
 
"अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर मी कुणाला पाठीशी घालत नाही. उलट अजित पवार दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा, असे माझे शब्द असतात. त्यामुळे कुणाच्याही राजकीय दबावाला बळी पडू नका. श्रीमंताच्या मुलाकडून ही घटना घडल्याने वेगळा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याला कुणीही बळी पडता कामा नये, ही खबरदारी पोलिस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे, अशा सुचना मी पोलिस आयुक्तांना दिल्या," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "पुण्यात दोन पोलिस अधिकारी आणि ब्लड रिपोर्ट घेणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाई करण्यात आली आहे. श्रीमंत व्यक्तीच्या मुलाने केलेलं कृत्य अतिशय बेजबाबदारपणाचं आहे. पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे दोन निष्पाप मुलांना जीव गमवावा लागला. याप्रकरणात नातू, वडील आणि आजोबा या तिघांवरही कारवाई करण्यात आली आहे. यावर काही राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडत आहेत. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. यामध्ये जो कुणी दोषी असेल त्याच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत," असेही ते म्हणाले.