काँग्रेसला ४०, सपाला चार जागा मिळणेही अवघड, अमित शाह यांचे भाकीत
27-May-2024
Total Views |
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडी आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. देशभरात काँग्रेस ४० आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला (सपा) ४ जागा मिळणेही अवघड आहे, असे भाकीत केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर, सलेमपूर आणि चंदौली येथे प्रचारसभांना संबोधित केले.
यावेळी ते म्हणाले, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगुलचालन हेच इंडी आघाडीचे धोरण आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडी आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. इंडी आघाडीस जनतेने सपशेल नाकारले असून काँग्रेसला देशभरात ४० तर अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात ४ जागाही मिळणे दुरापास्त असल्याचे भाकीत केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था कमालीची सुधारली असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सपा सरकारच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात गुंड होता. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात गुडांनी उलटे टांगून त्यांना सरळ करण्याचे काम सुरू आहे. सपाचा 'एक जिल्हा, एक गुंडा' फॉर्म्युला बदलून योगीजींनी 'एक जिल्हा, एक उत्पादन' आणून उत्तर प्रदेशच्या विकासासाठी काम केले आहे.
ही निवडणूक रामभक्तांवर गोळीबार करणारे आणि राम मंदिर बांधणारे यांच्यातील निवडणूक आहे. त्यामुळे ४ रोजीचा निकाल निश्चित असून ४०० जागा येणे निश्चित आहे. निकालाच्या दिवशी ४ राहुल गांधी पत्रकारपरिषद घेऊन आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडतील, असाही टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला आहे.