‘मी...येसूवहिनी’ तू धैर्याची अससी मूर्ती। माझे वहिनी माझी स्फूर्ती॥

    27-May-2024
Total Views |
Mi Yesuvahini drama

स्वातंत्र्यवीर सावरकरच म्हणतात, ‘तू धैर्याची अससी मूर्ती। माझे वहिनी माझी स्फूर्ती॥’ अशा या खुद्द स्वातंत्र्यवीरांची स्फूर्तिदेवता होत्या, त्या त्यांच्या वहिनी, येसूवहिनी... येसूवहिनींचे कार्य, त्यांचे धैर्य, शौर्य, त्याग, मातृभूमीनिष्ठा सादर करणारे सांगीतिक अभिवाचन म्हणजे ‘मी...येसूवहिनी’. सुमारे ११० मिनिटांचा हा सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम ‘समिधा-पुणे’तर्फे सादर केला जातो. त्याविषयी...

अंदमानातली ती एक पावसाळी दुपार... तिथे आता ‘काळे पाणी’ नव्हते. मात्र, आकाशात होते काळेकुट्ट ढग! त्या काळकोठडीत आम्ही एका विलक्षण अनुभूतीने, नि:शब्द मनाने, भरून आलेल्या अंत:करणाने आणि डोळ्यांतून अविरत वाहणार्‍या संवेदनांनी नतमस्तक झालो होतो. तेथेच त्या कोठडीत (पुलंच्या शब्दात गाभार्‍यात), आमच्या ‘मी...येसूवहिनी’ या कार्यक्रमाचे प्रारंभीचे स्तवन, स्वातंत्र्यवीरांच्या अदृष्य अस्तित्वासमोर, अस्मितेसमोर आम्ही सादर केले. सन २०११ हे तात्याराव सावरकरांच्या काळ्या पाण्यावरच्या जन्मठेपेच्या शिक्षेचे शताब्दी वर्ष होते. त्यानिमित्ताने सांगली येथील ‘बाबाराव स्मारक समिती’तर्फे, अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असे समजले. त्या कार्यक्रमांमध्ये संगीता ठोसर स्वातंत्र्यवीरांवरील काही पद्ये गाणार होत्या. अर्थातच, त्यासाठी संगीता ठोसर आणि दिलीप ठोसर अंदमानला जाणार होते. मात्र, ती पद्ये नुसतीच एकामागून एक अशी सादर न करता, त्यामध्ये ‘ऐतिहासिक घटनां’चा काही संदर्भ असावा, यासाठी त्या दोघांचा अटीतटीचा प्रयत्न चालू होता.
 
“तुम्ही चित्रलेखा पुरंदरे का? मी, दिलीप ठोसर. तुम्हीही आमच्यासोबत अंदमानला येणार आहात, असे समजले. तुमची आम्हाला थोडी मदत हवी आहे,” अशी स्वत:ची ओळख देत, ठोसरांनी संगीताताईंची कल्पना मला सांगितली. आम्ही तिघे भेटलो आणि ‘तुम्ही हे लवकरात लवकर लिहून द्याच,’ असा त्यांनी आग्रहच केला. मी तर अगदी भांबावूनच गेले. त्या ‘तेजोनिधी’बद्दल मी काय आणि कशी लिहिणार? संध्याकाळचे ५ वाजले होते. संभ्रमावस्थेतच मी घरी गेले आणि रात्रभर जागून शब्द जुळवित गेले. माझ्याही नकळत दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत २५ पाने लिहून झाली होती, ती त्या दोघांपुढे ठेवली. हे मी असे इतक्या अल्पवेळात कसे लिहू शकले? हे मलाही सांगता येत नव्हते. पण, त्याला एकमात्र मोठ्ठा आधार आमच्या घरातच होता. तो म्हणजे, माझे आदरणीय मामंजी बाबासाहेब पुरंदरे! तसे पाहिले तर, लहानपणापासूनच स्वा. सावरकरांच्या जाज्ज्वल्य देशभक्तीच्या कथा ऐकत आले होते. शिवाय, लग्नानंतर मामंजींच्या तोंडून, मातृभूमीच्या सेवेसाठी महान व्रत घेतलेल्या महाकवी, लेखक, क्रांतिकारकांच्या अग्रणी असलेल्या अशा या धुरंधराबद्दल ऐकताना, मनाला विलक्षण अशी भारावलेली अवस्था प्राप्त होत असे.
 
रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचे महानायक श्रीराम आणि श्रीकृष्ण, तसेच श्री अष्टभूजा देवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, सामर्थ्य ज्यांच्या अंतरंगात एकवटले होते, त्या स्वा. सावरकरांनी वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी आपले मृत्युपत्र तयार करावे आणि ते पत्र आपल्या मातेसमान असणार्‍या येसूवहिनीला पाठवावे... सगळे अजबच! ते काव्य महाविद्यालयात मी शिकवत असताना मनात एक विचार सतत येई, येसूवहिनींबद्दल अधिक माहिती आपण करून घ्यायला हवी. मग मिळेल तिथून ती वाचत गेले. टिपणे काढत गेले. वाटले, सावरकरांना आदर्श मानणारे असंख्य आहेत. पण, खुद्द सावरकरांची स्फूर्तिदेवता कोण होती? तर, ती त्यांची वहिनी! ते म्हणतात, ‘तू धैर्याची अससी मूर्ती। माझे वहिनी माझी स्फूर्ती॥’ दीर-भावजयीच्या या पवित्र नात्याबद्दल माझा आदर अधिकच वाढला. अशा सावरकरांवर आणि येसूवहिनींवर मी काही लिहावे, म्हणजे तळपत्या सूर्यप्रभेला हातात पकडण्याइतकेअवघड होते. पण, संगीताताईंच्या कल्पनेने ते धाडस करायला मी प्रवृत्त झाले. खूप मोठे आव्हान होते ते माझ्यासाठी! पण, त्यावेळी नंदादीपासारख्या शांतपणे तेवत राहाणार्‍या, पण प्रसंगी तेजशलाकेप्रमाणे तळपणार्‍या, कर्तव्यदक्ष, पतिव्रता येसूवहिनींचे बोट धरले आणि लिहित गेले.
 
माझ्यासारख्या सर्वसामान्यांना येसूवहिनींचे कार्य, त्यांचे धैर्य, त्यांचे शौर्य, त्यांचा त्याग, त्यांची मातृभूमीनिष्ठा या सगळ्या गोष्टी अज्ञातच होत्या. यानिमित्ताने त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्या, असे तीव्रतेने वाटले आणि त्यातूनच ही संहिता तयार झाली. ‘मी...येसूवहिनी!’ यात काही पद्ये सावरकरांची आणि संहितेतील आवश्यकतेनुसार रा. स्व. संघाची काही पद्ये समाविष्ट केलेली आहेत. तर, ती संहिता घेऊन ठोसर पतीपत्नींसमवेत मीसुद्धा अंदमानला पोहोचले आणि तिथे आम्ही तिघांनी ते पहिले सांगीतिक अभिवाचन सादर केले. त्यानंतर पुण्याला २०१८ साली आम्ही तिघे, वीणा गोखले व अमेय जोशी यांच्यासह हा कार्यक्रम करू लागलो. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. काही प्रयोगांनंतर नोकरीतील अतीव्यस्ततेमुळे अमेय जोशींच्या ऐवजी, विनोद पावशे आणि संजय गोखले आमच्यात सहभागी झाले. अशा रितीने आम्ही सहाजण मिळून हा कार्यक्रम करू लागलो. या सगळ्यांनी माझ्या संहितेला न्याय दिला आहे, असेच मी म्हणेन! संगीता ठोसर अतिशय स्पष्ट शब्दोच्चारात, सुमधूर आवाजात, ती सर्व पद्ये सादर करतात, तर वीणा गोखले येसूवहिनी, विनोद पावशे बाबाराव आणि संजय गोखले तात्याराव, संहितेतील संवादातून अतिशय समरसतेने तो काळ, त्या व्यक्ती आपल्यासमोर जीवंत उभा करतात. त्यामुळे हे श्रेय त्या सर्व कलाकारांचे आहे. दिलीप ठोसर अतिशय तत्परतेने, जबाबदारीने आपली सूत्रधाराची भूमिका पार पाडतात. असा हा आमचा सांगीतिक अभिवाचनाचा सुमारे ११० मिनिटांचा कार्यक्रम ‘समिधा-पुणे’तर्फे सादर केला जातो.

आजच्या काळातही येसूवहिनींना भावलेले सावरकरांचे विचार कसे मार्गदर्शक आहेत, तरुण पिढीने आणि समाजानेही त्यापासून प्रेरित व्हावे, अंतर्मुख व्हावे, याच हेतूने संपूर्ण कार्यक्रमात तंबोरा सोडून, इतर कोणत्याही वाद्याचा वापर केला जात नाही. आजपर्यंत पुण्यात व पुण्याबाहेर पेण, सातारा, कोल्हापूर, कर्‍हाड, संभाजीनगर, मुंबई, ठाणे, बेलापूर, सोलापूर अशा ठिकाणी या कार्यक्रमाचे एकूण ४५ प्रयोग झाले आहेत. विशेष म्हणजे, पुण्यातील एका प्रयोगाला स्वा. सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांच्या सूनबाई आदरणीय स्वामिनीताई सावरकर, तर ठाण्यातील प्रयोगाला स्वा. सावरकरांचे पुत्र विश्वासराव सावरकर यांची कन्या असिलताताई या उपस्थित होत्या. त्यांनी आम्हाला दिलेला आशीर्वाद आणि केलेली प्रशंसा ही आमच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी, अविस्मरणीय आहे. यामध्ये कोणतेही काल्पनिक प्रसंग नाहीत, असे त्या दोघींनी प्रशस्तीपत्रकही दिले! शेवटी एकच सांगावेसे वाटते की, क्रांतिकारकांच्या कथा होतात आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा. मात्र, येसूवहिनींनी स्वतःच्या व्यथेची कथा केली. ती कथा म्हणजेच, येसूवहिनींवरील हा एकमेव कार्यक्रम ‘मी...येसूवहिनी!’अंदमानातील स्वातंत्र्यवीरांचे ‘तीर्थ’ आम्ही सगळ्यांना वाटतो आहोत, आमच्या क्षमतेप्रमाणे! आणि परत एकदा भगूरहून अंदमानला जाण्याचे ठरवतो आहोत. आपणा सर्वांच्या सदिच्छा त्यासाठी असाव्यात, ही नम्र अपेक्षा!
 
 
डॉ. चित्रलेखा पुरंदरे