अभिमानास्पद! कान्समध्ये ३० वर्षांनी या भारतीय चित्रपटाने पटकावला 'ग्रॅंड प्रिक्स' पुरस्कार

    27-May-2024
Total Views |

chaya kadam 
 
 
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी यंदाचा ७७ व्या कान्स चित्रपट महोत्सव फारच आनंदी ठरला आहे. कान्समध्ये दोन दिवसांपूर्वी पायल कपाडिया दिग्दर्शित आणि मराठमोळी अभिनेत्री छाया कदम हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाला स्टॅण्डिंग ओव्हेशन मिळालं होतं. यानंतर आता याच चित्रपटाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ३० वर्षांनंतर ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाने कान्समध्ये मानाचा समजला जाणारा ‘ग्रँड प्रिक्स’ पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्कारवर भारतीय चित्रपटाने आपलं नाव कोरल्याने सध्या सर्वत्र या चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले जात आहे.
 
दरम्यान, अभिनेत्री छाया कदम यांनी पुरस्कार जिंकल्यानंतर पहिली पोस्ट करत म्हटले होते की, “आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाट्याला येते तेव्हा, तिच्यात जीव ओतून टाकलेला एक – एक क्षण जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हल उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची – लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच, एक एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथपर्यंत येऊन पोहचला आहे.”
 
माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार…की, तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहोचली आहे. खूप समाधान – आनंद आणि मन भरून आलं” अशी पोस्ट शेअर करत छाया कदम यांनी त्यांच्या तमाम चाहत्यांसह कलाकार मित्रमंडळींचे आभार मानले आहेत.