
भारतात आलेल्या आक्रांतांनी आमच्यावर राज्य केले, ते त्यांच्या बाहुबळावर नव्हे, तर आमच्या स्वकीयांचे निर्णय चुकले म्हणून. आमचेच देशबांधव जेव्हा देशहितापेक्षा, व्यक्तिगत लाभाला महत्त्व देतात, तेव्हाच पारतंत्र्याचे जोखड नशिबात येते. तेव्हा स्वराज्याचे सुराज्य व्हावे, असे मनोमन वाटत असेल, तर एक योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. आजही त्यापेक्षा भिन्न परिस्थिती भारतीयांसमोर नाही. म्हणून अखेरच्या मतदानाच्या टप्प्यातही मतदारांनी बेसावध आणि निर्धास्त राहण्याची एक चूक देशातील पुढील शंभर पिढ्यांसाठी मात्र शिक्षा ठरु शकते.
योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये असणारे अंतर अत्यंत सूक्ष्म असते. पण, याच अंतरावर देशाचे भविष्य निर्धारित करण्याची महाप्रचंड शक्ती असते. एखादा घेतलेला योग्य निर्णय देशाला सोन्याचे दिवस दाखवू शकतो, तर त्याचवेळी अयोग्य निर्णय घेतला गेल्यास, राष्ट्राला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. गजनवी नामक परकीय आक्रांत हजारो मैलांचा प्रवास करून भारतात येतो, भारतीयांचे श्रद्धास्थान असणार्या सोमनाथावर आक्रमण करून, ते देवस्थान भ्रष्ट करून, त्याची लूटमार करतो. जाताना कित्येक भारतीयांना गुलाम करून, याच भारतातून घेऊन जातो. हे सगळे घडत असताना आम्ही काय करत होतो? जर त्याचवेळी आमचा स्वार्थ, आमच्यातील भेद विसरून परकीय गजनवीविरोधात एकत्र उभे ठाकलो असतो, तर गजनवीचा पराभव अशक्य नक्कीच नव्हता. पण, दुर्दैवाने असे नाही झाले आणि या चुकलेल्या एका निर्णयामुळेच भारतमातेच्या वाट्याला, शेकडो वर्षांचे पारतंत्र्य आणि दु:ख आले, हे सत्य आहे.
पानिपतातदेखील असाच एक निर्णय चुकला, त्याचा परिणाम म्हणजे हातातोंडाशी आलेला विजयाचा घास, मोठ्या पराभवात परावर्तीत झाला. पराभव जरी सहज स्वीकारला नसला, तरीही त्याची मोजावी लागलेली किंमत फार मोठी होती. १९४७ मध्येदेखील आमच्या नेत्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने फाळणीला मान्यता देण्याचा चुकीचा निर्णय घेतला. त्यानंतर दहा लाख हिंदू-शिखांचा नरसंहार भारतीयांना उघड्या डोळ्यांनी निमूटपणे सहन करावा लागला. या सगळ्यानंतरदेखील त्या एका चुकीच्या निर्णयाचे गंभीर परिणाम आपला देश आजही भोगत आहे, हे वेगळेच. पटेलांच्या जागी नेहरूंना पंतप्रधानपदी बसवून, अजून एक चुकीचा निर्णय घेतला गेला. त्यामुळेच आपल्या देशाने एक लाख २५ हजार वर्ग किलोमीटरचा प्रदेश पाकिस्तान आणि चीनबरोबर गमावून बसलो. त्यावेळी चीनच्या सीमेवर सैन्याऐवजी केंद्रीय राखीव पोलीस दलाची गस्त ठेवण्यात आली होती, त्याचीच परिणती म्हणजे भारताने गमावलेला अक्साई चीनचा भूभाग. चुकीच्या या एका निर्णयामुळे आजवर भारत युद्धसदृश परिस्थितीला सामोरे जात आहे.
देशात होणारी निवडणूक हा काही फक्त ज्ञात- अज्ञातपणे, चांगले काम केलेल्या किंवा कमी चांगले कार्य केलेल्या लोकांना निवडून लोकसभेत पाठवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम नाही. निवडणुकांचे महत्त्व त्यापेक्षा कैकपटीने अधिक व्यापक आहे. हे राष्ट्रनिर्माणाचे एकप्रकारे चालवलेले युद्धच आहे, ज्याच्या निकालातून पुढील कित्येक वर्षांचे आपल्या देशाचे भविष्य अवलंबून असते. कारण, शासनकर्ता मातृभूमीशी प्रामाणिक आणि योग्य असेल, तर एका सक्षम, समृद्ध आणि सामर्थ्यशाली राष्ट्राची निर्मिती होते. पण, विदेशी विचारांनी प्रेरित आणि विदेशी पैशांचे व्यसन लागलेली व्यक्ती सत्तेत आल्यास, राष्ट्राची अधोगती निश्चितच होते.
सध्या सुरू असलेल्या निवडणूकरूपी युद्धातदेखील अनेक जण उघडपणे असे सांगतात की, मोदींविषयी आमची काहीही तक्रार नाही. पण, लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेले काही उमेदवार मात्र योग्य नाही. पण, असा तक्रारीचा सूर आळवणारे लोक हे विसरतात की, युद्धकाळात सेनापतीने घेतलेल्या निर्णयावर शंका घ्यायची नसते, तर त्याचे पालन करायचे असते. युद्धात प्रत्येक सैनिकामध्ये सेनापतीला पाहत, देशाच्या विजयासाठी अथक प्रयत्न करण्याचे व्यापक लक्ष्य ठेवायचे असते.
गजनवी आणि घोरी यांनी केलेले भारतावरील आक्रमण हे आपल्या पूर्वजांच्या फक्त स्वत:पुरते पाहण्याच्या वृत्तीचा परिणाम होता. ३० कोटी भारतीयांवर अडीचशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले भारतीयांच्या कूपमंडूक वृत्तीमुळेच! याच भारतीयांनी जालियनवाला इथे इंग्रजांच्या सांगण्यावरून, आपल्याच देशबांधवांवर गोळीबार केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेक क्रांतिकारकांवर अत्याचार करण्याचा आदेश देणारे विदेशी असले, तरी त्याच अमानुषपणे त्याची अंमलबजावणी करणारे भारतीयच होते, हे विसरून चालणार नाही. जेव्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी लाहोर इथल्या न्यायाधीशांना स्थानिक साक्षीदारांची आवश्यकता होती, तेव्हा ३०० भारतीयांनीच साक्ष दिली असल्याची नोंद राष्ट्रीय अभिलेखागारात आहे. देशाच्या पारतंत्र्याऐवजी आम्हा भारतीयांना इंग्रजांकडून मिळणार्या मानमरातब महत्त्वाचा वाटला आणि याच वृत्तीने आम्ही भारतीयांनी या देशाचे अतोनात नुकसान केले, हे कदापि विसरुन चालणार नाही.
एका राष्ट्राच्या निर्मितीत रस्ते, वीज यांचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे राष्ट्राचे चैतन्य जागृत होऊन, राष्ट्र विकासावाटेवर अग्रेसर झाले, तेव्हा देशाच्या वाईटावर उठलेल्या परदेशी शक्ती व्यथित झाल्या. ते भारताचा हा विकासरथ काहीही करून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. इतिहासाप्रमाणे त्यांना मदत करणारे हे भारतीयच आहेत. पराक्रमी नेतृत्व कायमच एक उन्नत राष्ट्रनिर्मितीचा प्रयत्न करते, मोफत पाणी, वीज, लॅपटॉप यांची खैरात वाटत नाही. जर एखाद्या देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सैनिकांचे बलिदान त्या देशातील नागरिकांना योग्य, सशक्त नेतृत्व निवडीसाठी प्रेरणा देत नसेल, तर हे त्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
आजचा भारत आपल्या देशाच्या संस्कृतीचे आणि वैभवाचे रक्षण करणार्या नेतृत्वाबरोबर उभा राहील की, मोफत आश्वासनांची खैरात वाटणार्यांच्या मागे फरफटत जाईल, हाच एक मुद्दा आहे. या देशात गेल्या काही वर्षांत खलिस्तान, दहशतवाद, काश्मीर ते कोईम्बतूर होणारे बॉम्बस्फोट, हिंदूंचा पदोपदी होणारा अपमान, प्रत्येक वर्षी होणार्या दंगली, भ्रष्टाचार, वाढती गरिबी, परदेशात भारतीयांच्या वाट्याला येणारी अवहेलना या सगळ्यांवर या देशाने मात केली आहे. हे झालेले एक मोठे परिवर्तन आहे. ५०० वर्षे संघर्ष केल्यानंतर उभारले गेलेले राम मिंंदर, हा तर सतत हिंदूविरोधी विष ओकण्यातच धन्यता मानणार्या मानसिकतेचा सपशेल पराभव होता. कोणी केला हा पराभव? कोणी स्थापन केली ही हिंदू गौरवाची पुनर्स्थापना? काश्मिरात एकही दहशतवादी जीवंत ठेवणार नाही, अशी गर्जना कोणी केली? संघाचे प्रचारक दिसत नाही, पण त्यांनी केलेले देशाचे परिवर्तन मात्र उठून दिसते.
असे हजारो स्वयंसेवक आहेत, ज्यांनी प्रचारासाठी बाहेर पडताना, आपल्या जन्मदात्या आईचे आशीर्वाद घेताना, भारतमातेला विजयी करणे, हेच या जीवनाचा अंतिम उद्देश असल्याचे वचन दिले होते. त्यांच्या या वचनाला पूर्ण करण्याची जबाबदारी त्या सर्व भारतीयांचीदेखील आहे. त्यांच्या तपःसाधनेला यश येण्याचा हाच तो क्षण आहे, त्यासाठी देशविरोधी शक्तींच्या विरोधात, बहुसंख्येने मतदान करण्याचे कर्तव्य भारतीयांना पार पाडावे लागेल. अशा अनेक प्रचारकांपैकी एक आहेत नरेंद्र मोदी. त्यांनी घेतलेल्या अनेक साहसी निर्णयांमुळेच हा देश सामर्थ्यशाली होण्याच्या राजपथावर अग्रेसर झाला आहे...सर्व भारतीयांसाठी योग्य निर्णय घेण्याचा निर्णायक क्षण आहे.
जेणेकरून कधी कोणाला असे म्हणण्याची वेळ येऊ नये की, ‘लम्हों ने खता की थी - सदियों ने सजा पायी।’ असे म्हणायच्या ऐवजी, ‘लम्हों ने संभाला था - सदियों ने संवारा हैं।’ असे आत्मविश्सावासने म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.
तरुण विजय
(अनुवाद : कौस्तुभ वीरकर)