दिल्लीतील बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; ७ नवजात बालकांचा मृत्यू
26-May-2024
Total Views | 41
नवी दिल्ली : शनिवार, दि. २५ मे २०२४ रात्री उशिरा दिल्लीतील विवेक विहार भागात असलेल्या एका बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली, ज्यामध्ये सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. याशिवाय पाच नवजात बालकांची प्रकृती चिंताजनक असून त्यापैकी एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, पूर्व दिल्लीतील विवेक विहारमध्ये हा अपघात घडला, जिथे बेबी केअर केंद्राला लागलेल्या भीषण आगीमुळे सात नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी अनेक मुलांची सुटकाही झाली, मात्र १२ जण जखमी झाले, त्यापैकी जखमी बालकांपैकी एका एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्ली अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, बेबी केअर सेंटर १२० यार्डच्या इमारतीमध्ये बांधण्यात आले होते. बेबी केअर सेंटरच्या शेजारी एक इमारत होती ती देखील आगीच्या भक्ष्यस्थानी होती मात्र सुदैवाने तिथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर पडलेले आहेत. आगीत काही ऑक्सिजन सिलिंडर फुटले असून ते घटनास्थळी दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या १६ गाड्यांनी तासाभराच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दि. २५ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास विवेक विहार पोलिस स्टेशनला आग लागल्याबद्दल पीसीआर कॉल आला होता. कॉल मिळताच विवेक विहारचे एसीपी आणि एसएचओ तात्काळ पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले, जिथे न्यू बॉर्न बेबी केअर हॉस्पिटल आणि त्याच्या शेजारील इमारतीला आग लागली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तीन मजली इमारत असून आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून इतर लोकांच्या मदतीने ११ नवजात बालकांना आगीपासून वाचवण्यात आले. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पूर्व दिल्लीतील एनआयसीयू हॉस्पिटल, डी-२३७, विवेक विहार येथे उपचारासाठी हलवण्यात आले.