केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे पाचही टप्प्यांची आकडेवारी जाहीर!
मतदानाच्या आकडेवारीत फेरफार करणे अशक्यच
25-May-2024
Total Views | 63
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे लोकसभा निवडणुकीच्या १ ते ५ टप्प्यांमधील एकूण मतदार, मतदानाची टक्केवारी आणि मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या शनिवारी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदानाच्या आकडेवारीमध्ये फेरफार शक्यच नसल्याचा पुनरूच्चारही आयोगाने केला आहे.
आकडेवारीनुसार, एकूण, पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के, तिसऱ्या टप्प्यात ६५.६८ टक्के, चौथ्या टप्प्यात ६९.१६ टक्के आणि पाचव्या टप्प्यात ६२.२० टक्के मतदान झाले आहे. त्याचप्रमाणे आयोगाने १ ते ५ टप्प्यांमधील एकूण मतदार, मतदानाची टक्केवारी आणि मतदान करणाऱ्या मतदारांची संख्यादेखील जारी केली आहे. त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण होणे आणि करणे आता अशक्य होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मततदान प्रक्रियेविषयी जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचा ठपका ठेवला आहे. मतदानाच्या आकडेवारीविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल आणि निरिक्षणामुळे आयोगास बळकटी प्राप्त झाली आहे. मिळालेल्या मतांच्या संख्येत कोणताही फेरफार शक्य नाही. मतदान झालेल्या मतांचे संकलन आणि साठवणूक ही प्रक्रिया कठोर, पारदर्शक आणि सहभागात्मक आहे. आयोग आणि त्यांचे राज्यभरातील अधिकारी वैधानिक बाबी लक्षात घेऊन शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने मतदारांच्या मतदानाची आकडेवारी प्रसारित करत असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये फेरफार केला जात आहे, असा आरोप देशातील विशिष्ट गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे फॉर्म १७सी आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जारी करावा, असी मागणी असणारी याचिकादेखील असोसिएसन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (एडीआर) या एनजीओतर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्थगित केली असून त्यावर उन्हाळी सुटीनंतर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे मतदानाच्या पाचही टप्प्यांची आकडेवारी जारी केली आहे.
अशी आहे प्रक्रिया
1. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित झाल्यानंतर मतदारांची अंतिम यादी उमेदवारांना दिली जाते.
2. सर्व उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे सर्व ५४३ मतदारसंघांसाठीच्या जवळपास १०.५ लाख मतदान केंद्रांसाठीचा स्वतंत्र फॉर्म १७सी देण्यात येतो.
3. फॉर्म १७सी मध्ये नोंदवलेल्या मतदारसंघातील एकूण मतांची संख्या कोणासही खोडसाळपणाने कधीही बदलली जाऊ शकत नाही, कारण ती सर्व उमेदवारांना उपलब्ध आहे.
4. निवडणूक आचार नियम, १९६१ च्या नियम ४७ V(२) (येथे रोमन आकडा आहे, तो तसाच ठेवावा) नुसार, उमेदवारांच्या एजंटना मतदान केंद्रापासून स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम स्टोरेजपर्यंत नेहमी फॉर्म १७सी सह वैधानिक कागदपत्रे सोबत ठेवण्याची परवानगी आहे.
5. उमेदवार किंवा त्याचा एजंट फॉर्म १७सी ची प्रत मतमोजणी केंद्रात आणेल आणि प्रत्येक फेरीच्या निकालाशी जुळवेल.