नवी दिल्ली: एकीकडे काँग्रेसप्रणित इंडी आघाडी यंदा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. त्याचवेळी इंडी आघाडीचे खंदे समर्थक असलेले योगेंद्र यादव यांनी मात्र पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असे आकडे दिले आहेत. त्यामुळे भाजपविरोधकांचे विस्कळीत धोरण पुन्हा एकदा उघड झाले आहे.
लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला आहे. आता केवळ एकच टप्पा बाकी असून त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहिर होणार आहेत. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने आपापल्या विजयाचे दावे केले आहेत. भाजपने यंदाची निवडणूक ही ४०० पारच्या घोषणेसह लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी इंडी आघाडीने भाजपला ४०० होऊ देणार नाही, असा दावा केला आहे.
राजकीय पक्षांसह योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर या दोन्ही निवडणूक तज्ज्ञ म्हणवणाऱ्यांनीही वेगवेगळे दावे केले आहेत. प्रशांत किशोर हे निवडणूक व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात तर योगेंद्र यादव हे निवडणुकी झालेले मतदान, आकडेवारी, कल आदींचे अभ्यासक मानले जातात. योगेंद्र यादव हे सत्ताधारी भाजपचे विरोधक तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचे समर्थक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे यादव यांच्या आकडेवारीवर देशातील एक विशिष्ट इकोसिस्टीम डोळे झाकून विश्वास ठेवत असते. यंदा मात्र योगेंद्र यादव यांनी भाजपला स्वबळावर २४० ते २६० जागा तर रालोआस ३५ ते ४५ जागा मिळतील. म्हणजेच यादव यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजप – रालोआस २७५ ते ३०५ जागा मिळणार आहेत. त्याचवेळी काँग्रेसला ८५ ते १०० आणि इंडी आघाडीस १२० ते १३५ जागा मिळतील. म्हणजेच इंडी आघाडीस केवळ २०५ ते २३५ जागा मिळतील, असे यादव यांनी म्हटले आहे.
भाजपच्या जाळ्यात विरोधक अडकले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच इंडिया टिव्ही या खासगी हिंदी वृत्तवाहिनीस मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी ‘४०० पार’ या घोषणेमुळे विरोधक कसे फसले, याचा खुमासदार किस्सा सांगितला. त्यात तथ्यही आहे. कारण भाजपने ‘अबकी बार ४०० पार’ अशी घोषणा दिल्यामुळे विरोधी आघाडी आणि त्यांची इकोसिस्टीम “भाजपला ४०० जाना मिळणे शक्यच नाही” असा दावा करू लागली. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी ४०० नव्हे तर २७२ खासदारांची गरज असल्याचा त्यांना विसरच पडला. परिणामी एकप्रकारे विरोधी पक्षांनीही पुन्हा मोदीच पंतप्रधान होणार, हे मान्य केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.