मुंबई : ७७ वा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ यंदा भारतासाठी खूप महत्वाचा आणि खास आहे. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटाला ४८ वर्षांनंतर या फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंगचा मान मिळाला. याशिवाय भारतीय कलाकार, सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर व उद्योजकांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. शिवाय भारतीय चित्रपट आणि कलाकारांना या महोत्सवात विविध श्रेणींमध्ये नामांकने देखील मिळाली होती. त्यातच अभिनेत्री अनासूया सेनगुप्ता ही ‘कान्स’ मध्ये पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय कलाकार ठरली आहे.
अनासूया सेनगुप्ता पश्चिम बंगालमधील असून तिला ‘द शेमलेस’ या कलाकृतीसाठी अन सर्टन रिगार्ड प्राइज सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटात अनसूया सेनगुप्ताने एक सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. अनासूया सेनगुप्ताचा 'शेमलेस' हा चित्रपट बुल्गारियाचे सिनेनिर्माते कॉन्स्टेंटिन बोजानो यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात ओमरा शेट्टी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. आणि अभिमानाची बाब म्हणजे अनासूया हिने कान्समध्ये पुरस्कार पटकावण्यात पहिल्या भारतीय अभिनेत्री मान मिळवला आहे.