प्रशासनाच्या कारवाईनंतर बार व पब मालक, कर्मचारी आक्रमक

    24-May-2024
Total Views |
pune bar owners strike


पुणे :     पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करत शहरातील तब्बल ५० पब व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुणे प्रशासनाच्या धडक कारवाईनतंर बार व पब मालक, कर्मचारी संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कारवाईविरोधात बार व पब मालक, कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 
दरम्यान, पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपीने मद्यपान/ड्रग्ज सेवन केल्याचे समोर आल्यानंतर बारमालक, कर्मचारी सध्या रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत. प्रशासनाच्या कारवाईनंतर तब्बल २५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासन काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

 
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण नेमकं काय?

पुण्यातील कलानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अपघात घडला असून यात दोन जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असून त्याने मद्यप्राशन करुन गाडी चालवली. याशिवाय त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवानाही नव्हता.

या प्रकरणात वेदांत अग्रवाल याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सदर प्रकरणात विशाल अग्रवालसह पब मालकांचा समावेश आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे ७ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. परंतू, न्यायालयाने येत्या २४ तारखेपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.