कट्टरपंथीयांकडून 'हमारे बारह' चित्रपटाच्या निर्मात्यांना 'सर तन से जुदा'ची धमकी
24-May-2024
Total Views |
मुंबई : मुस्लीम महिलांची समाजातील दयनीय अवस्था दाखवण्यासाठी बनवण्यात आलेल्या 'हमारे बारह' या चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाल्यानंतर कट्टरपंथी संतापले आहेत. आपला राग काढण्यासाठी कट्टरपंथीयांनी दिग्दर्शक कमल चंद्रा, अभिनेता अन्नू कपूर आणि अभिनेत्री आदिती धीमान यांना 'सर तन से जुदा' करण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. धार्मिक कट्टरता पसरवणाऱ्या गाण्यांसह सोशल मीडियातील पोस्टमध्ये असे लिहिले जात आहे की चित्रपटाच्या रिलीजला फक्त विलंब झाला आहे, त्यानंतर कलाकार आणि निर्मात्यांचा 'शिरच्छेद' केला जाईल.
एका नेटकऱ्याने अशा धमक्या देणाऱ्या लोकांच्या खात्यांची यादी पोस्ट केली आहे. तसेच याकडे मुंबई पोलिसांचे लक्ष वेधून कारवाई करण्यास सांगितले आहे. या अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, धमक्या देणाऱ्यांमध्ये 'तेहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान'चे कट्टरपंथीही आहेत, जे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना अशा धमक्या देत आहेत. इसिसचा शिरच्छेदाचा व्हिडिओ कट्टरपंथीयांनी शेअर करत निर्मात्याला धमकवण्याचा प्रयत्न केला आहे.
याशिवाय, यातील काही कट्टरपंथींचा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या युनिटशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. अन्नू कपूर आणि चित्रपटाशी संबंधित इतर लोकांविषयी हिंसा करण्यास भडकावले आहे. या चित्रपटाच्या टीझरच्या निषेधार्थ धार्मिक घोषणा आणि बंदुकीच्या गोळ्या असलेला व्हिडिओ शेअर केला जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्याचा फोन नंबरही सार्वजनिक करण्यात आला असून कट्टरपंथी निर्मात्याला व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्याही देत आहेत.
'हमारे बारह'चा अधिकृत ट्रेलर रिलीज झाल्यानंतर कलाकार आणि निर्मात्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. या चित्रपटात कट्टरतावादी मौलानाच्या प्रभावाखाली मुस्लिम महिलांवर कसा अत्याचार होतो आणि त्यांची काय अवस्था होते हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात अन्नू कपूर, अश्विनी काळसेकर आणि मनोज जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्याचा प्रीमियर झाला. यापूर्वी या चित्रपटाचे नाव 'हम दो हमारे बारह' असे होते, आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या विनंतीवरून चित्रपटाचे नाव बदलून 'हमारे बारह' करण्यात आले आहे.