मुंबई : २०११ साली झालेल्या अभिनेत्री लैला खान मर्डर प्रकरणात तब्बल १३ वर्षांनी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात लैलाच्या सावत्र वडिलांना काही दिवसांपूर्वी मुंबई सेशन कोर्टाने दोषी ठरवले होते. आता त्यांना कोर्टाने शिक्षा सुनावली असून लैला खान आणि तिच्या कुटुंबातील ५ सदस्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात लैला खानचे सावत्र वडील परवेज टाक यांना दोषी ठरवत १३ वर्षांनी कोर्टाने त्यांना शुक्रवार २४ मे रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. लैलाच्या हत्येनंतर आता १३ वर्षांनी तिच्या कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळाला आहे.
२०११ मध्ये लैला तिची आई शेलिना पटेल आणि अन्य चार भावंडांसोबत गायब असल्याची तक्रार तिच्या वडीलांनी नादिर पटेल यांनी केली होती. आणि त्यानंतर तपास सुरु झाला. या प्रकरणात पोलिसांना नाशिकच्या इगतपुरी येथे आगीने अर्ध जळालेलं फार्महाऊस सापडलं होतं आणि लैलाच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशनही नाशिकमध्येच दाखवत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला होता. त्यानंतर संशयाची सुई अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांवर गेली. अधिक शोध केल्यानंतर त्या फार्महाऊसमध्येच परवेज यांनी लैला खानचा मृतदेह पुरल्याचे समोर आले.
लैलाच्या कुटुंबात इगतपुरीमधील संपत्तीवरुन वाद झाले होते. त्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी पत्नी शेलीनाची हत्या केली. शेलीनाची हत्या करताना तिच्या मुलांनी पाहिल्यामुळे परवेजने लैला, बहीण अमीना, जुळे भाऊ बहीण आणि चुलत बहीण रेश्मा यांची देखील निर्घुण हत्या केली होती. त्यांच्याही हत्येनंतर त्याच बंगल्यात त्यांनी मृतदेह पुरले होते.
लैला खानने २००२ मध्ये कन्नड चित्रपटसृष्टीतून अभिनयाची सुरुवात केली होती. 'मेकअप' या कन्नड चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर राजेश खन्ना यांच्या 'वफा : अ डेडली लव्ह स्टोरी' या चित्रपटात तिने काम केलं होतं.