शाहरुख खानला Sun Stroke, रुग्णालयात उपचाराअंती मिळाला डिस्चार्ज

    23-May-2024
Total Views |
 
shah rukh khan
 
 
मुंबई : अभिनेता शाहरुख खान याने नुकतेच २० मे रोजी लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान कुटुंबासह केले होते. त्यानंतर अहमदाबाद येथे आयपीएलच्या मॅचसाठी गेला असता उष्माघातामुळे एकाएकी तब्येत बिघडल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात काल दिनांक २२ मे २०२४ रोजी दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती सुधारत असल्याचे त्याची मैत्रिण अभिनेत्री जुही चावला हिने सांगितले आहे. तसेच, उपचार केल्यानंतर त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
 
उन्हामुळे शाहरुखची प्रकृती बिघडली आणि त्याला तात्काळ अहमदाबाद येथील KD रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा आणि त्यामुळे झालेले डिहायड्रेशन हे त्याची तब्येत बिघडण्याचे मूळ कारण होते. आयपीएलमधील(IPL) प्ले ऑफ सामन्यासाठी शाहरुख स्वत:ची टीम कोलकाता नाईट रायडर्स(KKR)ला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबादला गेला होता. दरम्यान, KD रुग्णालयातील डॉक्टरांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होत होता. अशातच मंगळवारी अहमदाबादमध्ये केकेआर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्ले-ऑफ सामना झाला. या मॅचसाठी शाहरुख दोन दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला होता. सामना संपल्यानंतर, शाहरुख रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील ITC नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला, जिथे या सगळ्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. परंतु, बुधवारी सकाळी अभिनेत्याची प्रकृती बिघडली.
 
मिळालेल्या हवामान खात्याच्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. देशभरात अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे रुग्ण उपचार घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.