मुंबई, दि.२३ : प्रतिनिधी मुंबई महानगरात पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून ठिकठिकाणी नदी आणि नाल्यातून गाळ उपसा करण्याची कामे सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार कामांच्या गतीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अचानक भेट देवून वाकोला नाला आणि मिठी नदीतून गाळ उपसा करण्याच्या कामाची पाहणी केली.
महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी वांद्रे-कुर्ला संकुल येथे वाकोला नदीवरील पुलावरून वाकोला नदीतील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. पन्टून संयंत्रावर स्थित पोकलेन लाँग ब्रूम संयंत्राच्या सहाय्याने या ठिकाणी कामे सुरू होती. वरच्या दिशेला असलेल्या भारत नगर वसाहतीच्या बाजूने येणारा तरंगता कचरा व गाळ सातत्याने काढला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यानंतर आयुक्त गगराणी यांनी मिठी नदी जंक्शन येथून मिठी नदीतील गाळ उपसा आणि नदी रुंदीकरण, संरक्षक भिंत बांधणी इत्यादी कामांची देखील पाहणी केली. या ठिकाणी उत्तर बाजूस एच पूर्व विभागाची हद्द आहे. तर दक्षिण बाजूस एल विभागाची हद्द आहे. दक्षिण बाजूकडील नदीचे रुंदीकरण त्या ठिकाणी असलेल्या बांधकामांविषयीची बाब न्यायप्रविष्ठ असल्याने प्रलंबित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. माननीय न्यायालयाकडून याविषयी आदेश प्राप्त करून सदर बांधकामे निष्कासित करावीत, पात्र/अपात्रता तपासून पुनर्वसनाची कार्यवाही करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी याप्रसंगी दिले.
अतिरिक्त आयुक्त शिंदेंकडूनही ठिकठिकाणी पाहणी
दरम्यान, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी देखील पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी भेटी देऊन गाळ उपसा कामांची पाहणी केली. वांद्रे पश्चिम येथील एसएनडीटी नाला, अंधेरी पश्चिम येथील रसराज नाला, अंधेरी भुयारी मार्ग, गोरेगाव पश्चिम मधील वालभट नदी, मालाड भुयारी मार्ग, कांदिवली येथे पोईसर नदी, बोरिवली पूर्व येथे रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे कल्वर्ट, दहिसर येथे पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ एस. एन. दुबे रस्त्यावर एमएमआरडीए मार्फत मेट्रो प्रकल्प अंतर्गत पर्जन्य जलवाहिनीची सुरू असलेली कामे इत्यादींची डॉ. शिंदे यांनी पाहणी केली.
नाल्यांशेजारी असलेल्या जुन्या भिंती पावसाळ्यानंतर दुरुस्त कराव्यात, जोरदार पावसाप्रसंगी भूयारी मार्गांच्या ठिकाणी पाणी पातळी वाढल्यास वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील कल्वर्ट रेल्वेच्या यंत्रणेकडून योग्य रीतीने स्वच्छ करून घ्यावेत, असे निर्देश डॉ. शिंदे यांनी दिले. मेट्रो ९ अंतर्गत दहिसर मध्ये एस. एन. दुबे मार्गावर एमएमआरडीएमार्फत सुरू असलेले पर्जन्य जलवाहिनीचे काम चार दिवसात पूर्ण करण्याची सूचना देखील त्यांनी एमएमआरडीए प्रशासनाला केली.