नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये अग्नीवीर योजनेविषयी टिप्पणी करून सैन्यदलाचा वापर राजकारणासाठी करू नका, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिले आहेत. भारतीय राज्यघटना बदलली जाऊ शकते किंवा विकली जाऊ शकते असा चुकीचा आभास निर्माण करणारी विधाने त्यांच्या स्टार प्रचारकांनी करू नयेत, याची काळजी घेण्यास निवडणूक आयोगाने काँग्रेसला सांगितले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आपल्या सभांमध्ये अग्निवीर योजनेबाबत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यावर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि उमेदवारांना संरक्षण दलांचे राजकारण करू नये आणि संरक्षण दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे निर्देश दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचत भाजप आणि काँग्रेसचे स्टार प्रचारक देशभरात एकमेकांवर आरोप करत आहेत. अनेक वेळा नेत्यांकडून त्यांच्या भाषणात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला जातो, त्या संदर्भात निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांना योग्य शब्द वापरण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी आणि शिष्टाचार राखण्यासाठी औपचारिक नोटीस जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.