शहरांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी प्रकल्प महत्वाचे :आयुक्त भूषण गगराणी

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केला विश्वास

    22-May-2024
Total Views |

mumbai press club

मुंबई, दि.२२ : प्रतिनिधी 
मुंबईत सुरू असलेल्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे लवकरच मुंबईमध्ये सामाजिक-आर्थिक परिवर्तन होईल, असा विश्वास मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.  गगराणी म्हणाले, “आज आपण जे प्रतिष्ठित पायाभूत सुविधा प्रकल्प पाहत आहोत ते केवळ शहराच्या गतिशीलतेतच नव्हे तर सामाजिक-अर्थव्यवस्थेच्या उभारणीतही महत्वपूर्ण बदल घडवून आणणारे ठरतील.
मंगळवार, दि.२१ रोजी मुंबई प्रेस क्लब आयोजित ‘मुंबई राहण्या योग्य, आधुनिक शहर’ या विषयावर आयोजित केलेल्या विचारसत्रात ते बोलत होते. यावेळी निवृत्त प्रशासक आर सी सिन्हा आणि वास्तुविशारद आणि गृहनिर्माण कार्यकर्ते पी के दास हे या चर्चासत्रात सहभागी होते. नवीन कोस्टल रोड, अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांसह आणि नवीन वाहतूक कॉरिडॉर बनवणाऱ्या मेट्रो लाइन्स यासारख्या प्रकल्पांसह, शहर सध्या एक उन्मत्त पायाभूत सुविधांचा अनुभव घेत आहे. धारावीच्या परिवर्तनाची तयारी सुरु आहे. अशावेळी ही विकासाची लाट प्रगतीच्या मार्गावर आहे की अनवधानाने मुंबईचे चैतन्य खुंटते आहे? याविषयी या चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले.
“प्रकल्प झाले नसते तर?’’ याबाबत बोलताना गगराणी म्हणाले, उदाहरणार्थ, मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने पुणे शहराची गतीमानता बदलल्याचे ते म्हणाले. “आज पुणे देशातील एक आयटी हब बनले आहे. केवळ या कनेक्टिव्हिटीमुळे पुणे देशातील एक महत्वाचे संशोधन आणि विकास केंद्र बनले आहे. यावरून असे दिसून येते की पायाभूत सुविधा प्रकल्प केवळ शहरातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नसून अनेक सामाजिक-आर्थिक फायदे देखील घेऊन येतात,” गगराणी म्हणाले.
२५ वर्षांपूर्वी मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या पूर्णत्वाची जबाबदारी सांभाळणारे सेवानिवृत्त आयएएस सिन्हा यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी किती वेगाने काम केले याच्या आठवणी सांगितल्या. “आम्ही सर्वत पहिले प्रतिकृती बनवण्याकरिता विचार केला. कारण भारतात यापूर्वी कोणताही एक्सप्रेसवे बांधला गेला नव्हता.” वास्तुविशारद पीके दास यांनी शहराचे हरित आच्छादन वाढले पाहिजे यावर प्रकाश टाकला. तसेच, मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामांमुळे शहराची हिट आयलंड कडे वाटचाल होत असल्याची टीका केली. मात्र, या दाव्याचे खंडन करत गगराणी यांनी प्रतिक्रिया दिली. “१८५७ मध्ये, जेव्हा आपला देश पहिला स्वातंत्र्ययुद्ध लढत होता, तेव्हा लंडन आपले पहिले मेट्रो नेटवर्क बनवत होते. आज लंडनमध्ये मेट्रो मार्गांची एकूण लांबी ४०० किमी आहे, तर मुंबईत आम्ही दहा वर्षांत ३०० किमी मेट्रो मार्ग बांधणार आहोत. सार्वजनिक वाहतूक नेटवर्कच्या या बळकटीकरणाचा समाजातील प्रत्येकाला फायदा होईल,” असे गगराणी म्हणाले.