मुंबई, दि.२२: प्रतिनिधी मुंबई मेट्रो २ अ वरील मालाड पश्चिम स्थानकाचे नाव बदलून मोतीलाल ओसवाल मालाड मेट्रो स्थानक, असे करण्यात आले आहे. खासगी सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून स्थानकाला हे नाव देण्यात आले आहे. नामांतर करण्याच्या बदल्यात कंपनीकडून मेट्रो स्थानिकावर विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मुंबई पोलीस जॉईंट कमिशनर सत्यनारायण चौधरी आणि तारक मेहता का उल्टा चश्मा मधील कलाकार शैलेश लोढा यांच्या उपस्थितीत आयएएस अधिकारी पराग जैन यांच्या हस्ते मालाड पश्चिम मेट्रो स्टेशनचे नाव बदलून मोतीलाल ओसवाल मेट्रो स्टेशन करण्यात आले.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस या वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनीने मुंबईच्या मालाड पश्चिम मेट्रो स्थानकाचे स्टेशन ब्रँडिंग हक्क विकत घेतल्याची घोषणा केली. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे समूह व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोतीलाल ओसवाल यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, "मालाड वेस्ट मेट्रो स्थानकासाठी स्टेशन ब्रँडिंग अधिकार संपादन करणे ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. मालाडमधील आमच्या कार्यालयात ४००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.आमच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाबा आहे."