मुंबई : अभिनेत्री राखी सावंत कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते. पण सध्या राखीची तब्येत खालावली असून तिला ट्यूमर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राखी सावंतवर नुकतीच रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून सध्या तीची प्रकृती थोडीफार बरी होत असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे राखीच्या तब्येतीबद्दल अपडेट आली असून राखीचा एक्स पती रितेशने आता मोठा खुलासा केला आहे. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या, असे रितेशने सांगितले आहे.
रितेशने पापाराझींशी संवाद साधताना हा मोठा खुलासा केला असून राखीला आणि मला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु असून नेमकं काय घडलं याबाबत आम्ही लवकरच माहिती देऊ असं देखील तो म्हणाला आहे. तसेच, ज्या लोकांनी आम्हाला धमक्या दिल्या होत्या त्यांनी आमच्यापासून लांब राहावे. आमचा शत्रू कोण आहे, हे सर्वांनाच माहित आहे. त्या व्यक्तीविरोधात पुरावे मिळाल्यावर मी या गोष्टींचा खुलासा करेन. यावेळी आम्ही कायदेशीर मार्गाने या गोष्टींचा खुलासा करु, असेही तो म्हणाला आहे.
राखी सावंतच्या तब्येतीबद्दल बोलायचे झाल्यास तिची ट्युमर टेस्ट करण्यात आली होती. जर का या टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर डॉक्टर केमो थेरपी आणि पुढील उपचार सुरु करतील. राखीला कॅन्सर नसावा आणि ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करत असल्याचे देखील रितेशने म्हटले. सध्या राखी डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहे. तसेच, “मी तिचा नवरा नाही. मी तिची मित्राप्रमाणे काळजी घेत आहे. मी तिचा शुभचिंतक आहे. लोकांनी मला ट्रोल केले तरीही मला फरक पडत नाही. मी तिच्या पाठीशी कायम उभा राहिन”, असेही तो म्हणाला आहे.