घरात घुसून बलात्कार अन् हत्या; कोर्टाने 'अमीरुल इस्लाम'ला सुनावली फाशीची शिक्षा

    21-May-2024
Total Views |
 HighCourt
 
कोची : केरळ उच्च न्यायालयाने एका विधी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या अमीरुल इस्लामला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. दि. २८ एप्रिल २०१६ च्या या घटनेत अमीरुलला एक वर्षाच्या सुनावणीनंतर जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध अमीरुलने उच्च न्यायालयात अपील केले होते. सोमवार, दि. २० मे २०२४ उच्च न्यायालयाने अमीरुलची याचिका फेटाळली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती पीबी सुरेश कुमार आणि न्यायमूर्ती एस मनू यांच्या खंडपीठात झाली. बचाव पक्षाच्या वकिलांनी अमीरुल इस्लामला निर्दोष घोषित केले आणि कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करण्याची विनंती केली. तर राज्य सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी अमीरुलच्या कृतीला 'दुर्मिळातील दुर्मिळ' असे म्हटले आणि कनिष्ठ न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हायकोर्टाने अमीरुलचे अपील फेटाळून लावले.
 
ही घटना दि. २८ एप्रिल २०१६ ची आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात कायद्याचे (एलएलबी) शिक्षण घेत असलेल्या ३० वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच घरात बलात्कार झाला. बलात्कारानंतर पीडितेची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना कुरुपमपाडीजवळील पेरुंबवूर येथे घडली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, आसाममधून केरळमध्ये मजूर म्हणून गेलेल्या अमीरुल इस्लामचे नाव पुढे आले. या घटनेच्या सुमारे ४९ दिवसांनी अमीरुल इस्लामला अटक करण्यात आली. त्याच्यावर भादंवि कलम ४४९, ३४२, ३०२, ३७६ आणि ३७६ (ए) अन्वये कारवाई करण्यात आली.
 
पोलिसांनी दि. १७ सप्टेंबर २०१६ रोजी अमीरुल इस्लामविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. फोन लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग आणि डीएनए चाचणीच्या आधारे अमीरुलला अटक करण्यात आली. विद्यार्थ्यांनीला एकटी पाहून अमीरुलने घरात घुसून बलात्कार केला होता. बलात्कार करून अमीरुल तिची धारदार शस्त्राने हत्या केली. विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या केल्यानंतर अमिरुलने तात्काळ केरळ सोडले होते.
 
अमिरुल इस्लामला केरळ पोलिसांनी तामिळनाडूतील कांचीपुरम येथून अटक केली. त्याच्या अटकेत १०० हून अधिक पोलिसांनी १५०० हून अधिक लोकांची चौकशी केली. एर्नाकुलम जिल्हा न्यायालयाने २०१७ मध्ये अमीरुल इस्लामला या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायाधीशांनी ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे म्हटले होते. अमिरुलला वेगवेगळ्या कलमांतर्गत वेगवेगळ्या शिक्षा झाल्या आहेत. या सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील.