जनरल प्रॅक्टिस आणि ‘फॅमिली डॉक्टर’

    20-May-2024
Total Views |
General Practice and Family Doctor
 
‘जनरल प्रॅक्टिस’ आणि ‘फॅमिली फिजिशियन’ ही देखील एक प्रकारची वैद्यकीय स्पेशालिटी आहे. ‘फॅमिली डॉक्टर’ला सर्व वैद्यकीय विषयांचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ‘हिस्ट्री’ व तपासणीवर अचूक निदान करण्याची क्षमता आवश्यक आहे. निदान पक्के झाल्यावर पुढील उपचार देणे सोपे जाते. आजारांच्या निदान व उपचार याशिवाय लसीकरण, कुटुंब नियोजन, साथीच्या आजारांचा नियंत्रणाबद्दल लोकशिक्षण, दुर्धर आजारात रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांस दिलासा देणे इत्यादी अनेक कामे चांगला ‘फॅमिली डॉक्टर’ करू शकतो.

माझे बालपण हे चाळीमध्ये गेले. प्राथमिक शिक्षण मुलुंडच्या रतनबाई म्युनिसिपल शाळेत झाले. मोफत आरोग्य तपासणी, मोफत देवीची लस, बीसीजी लस, नियमित थंड दुधाची बाटली, बिस्किटे यामुळे बालपण मजेत गेले. क्वचित प्रसंगी आजार आलाच, तर महात्मा गांधी रोडवरील महापालिकेच्या दवाखान्यातून औषध मोफत मिळत असे. खासगी फॅमिली डॉक्टरांची त्यावेळी फी २ रुपये होती. ती देखील त्यावेळेसच्या आर्थिक परिस्थितीनुसार जास्त वाटायची.चाळीत कोणी जास्त आजारी असल्यास ‘फॅमिली डॉक्टर’ला व्हिजिटला बोलावले जायचे. ५० वर्षांपूर्वी ‘फॅमिली डॉक्टर’ हे आरोग्य सेवेतील मुख्य अंग होते व त्यांना भरपूर मान असायचा. भारदस्त व्यक्तिमत्त्व, रुग्णाच्या आजाराबद्दल सहानुभूती, कमीतकमी औषधांमध्ये आजार बरा करणे, ही त्यावेळेसच्या ‘फॅमिली डॉक्टर’ची वैशिष्ट्ये असायची. हळूहळू स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट व कॉर्पोरेट हॉस्पिटलचा उदय झाला.

‘फॅमिली डॉक्टर’चे महत्त्व व मान कमी होऊ लागला. याच काळात महापालिकेचे दवाखाने, सरकारी दवाखाने व इस्पितळे यांच्या सेवेवर प्रचंड ताण पडू लागला. तेथील उपचारांचा दर्जा घसरू लागला. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या दोन दशकांत खासगी दवाखाने व कॉर्पोरेट हॉस्पिटलचे पेव फुटले. खासगी रुग्णालये वाढल्यामुळे अनावश्यक रुग्ण भरतीचा कल वाढू लागला. स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर फक्त आपल्या शाखेपुरतं काम बघू लागले. संपूर्ण रुग्ण बरा व्हावा, यासाठी रुग्णालयात काही प्रयत्न होत नसत. या सर्व प्रकारांमुळे समाजाला पुन्हा चांगल्या ‘फॅमिली डॉक्टर्स’ची गरज भासू लागली. त्यांचा कल पुन्हा ‘फॅमिली डॉक्टर’कडे वळू लागला.दुर्दैवाने, आपल्या देशात ‘फॅमिली डॉक्टर’ किंवा जनरल प्रॅक्टिशनरकडे तुच्छतेने पाहिले जाते. ‘फॅमिली डॉक्टर’ हे आरोग्य सेवेतील महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. सर्वच आजारांना इस्पितळाची किंवा तज्ज्ञांची गरज नसते. आजार प्राथमिक स्तरावर असेल. योग्य निदान व उपचार केल्यास इस्पितळाची पायरी चढण्याची गरज नसते.
 
आज अस्तित्वात असलेल्या ‘फॅमिली डॉक्टर’मध्ये एमबीबीएस डॉक्टर फार कमी आहेत. बरेचसे होमियोपॅथिक व आयुर्वेदिक डॉक्टर चाचपडत अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करताना आढळतात. त्यांना आम्ही अ‍ॅलोपॅथीचे व्यवस्थित ज्ञान देत नाही. कायदेशीररित्या प्रॅक्टिस करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे ‘फॅमिली डॉक्टर’ची आरोग्य सेवेत असणारी महत्त्वाची भूमिका लुप्त होत गेली. नवीन एमबीबीएस. झालेले डॉक्टर इच्छा असो किंवा नसो, ते पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी धडपडतात. कारण, खर्‍या ‘फॅमिली डॉक्टर’ वा जनरल प्रॅक्टिशनर यांना होमियोपॅथी व आयुर्वेद डॉक्टर करत असलेल्या अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिसशी स्पर्धा करावी लागते. आजही भारतासारख्या प्रगतीच्या पथावर असणार्‍या देशाची खरी गरज जास्त ‘फॅमिली डॉक्टर्स’ची आहे. आरोग्य सेवा जर प्रायमरी, सेकंडरी व टर्शरी अशा तीन विभागांत विभागली गेली तर प्रायमरी किंवा प्राथमिक आरोग्य सेवा हे ‘फॅमिली डॉक्टर’, महानगरपालिका व सरकारी दवाखाने व्यवस्थित देऊ शकतात. सर्दी, खोकला, ताप, जुलाब इत्यादी नेहमीच्या लक्षणांवर प्राथमिक स्वरुपाची तपासणी करून योग्य औषधे दिल्यास अगदी ९० टक्के रुग्ण बरे होण्याची शक्यता आहे. यातील काही लक्षणे जास्त दिवस लांबली किंवा रुग्णास जास्त त्रास होत असल्यास, लॅबोरेटरीच्या जुजबी चाचण्यांनी रोगांचे निदान करता येते.

हल्ली ‘जस्टीफिकेशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ अजिबात राहिले नाही. कुठली चाचणी आपण का करतो आहोत, याबद्दल डॉक्टरांमध्ये संभ्रम असतो व भरमसाट चाचण्या रुग्णाच्या माथी मारल्या जातात. रुग्णाचा आजार गंभीर असेल व त्याचा बाह्यरुग्ण तत्त्वावर उपचार करता येणार नसतील, तर रुग्णाला भरती करावे (सेकंडरी हेल्थ केअर). यासाठी कॉर्पोरेट हॉस्पिटलची गरज नाही. छोट्या हॉस्पिटलमध्ये निम्म्या बजेटमध्ये रुग्ण बरा होऊ शकतो. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे वास्तव्य कमीतकमी असावे. रुग्णास हॉस्पिटलमधील जंतू व विषाणूंचा संसर्ग (हॉस्पिटल इन्फेक्शन) होण्याची शक्यता, कुटुंबातील इतर व्यक्तींची तारांबळ हे सर्व टाळण्यासाठी रुग्णालयातील वास्तव्य कमीतकमी असावे. आजार अगदी गंभीर, धोकादायक असेल व त्यास अतिदक्षता, व्हेंटिलेटर, मेजर सर्जरी, अँजिओग्राफी इत्यादी गोष्टींची आवश्यकता असेल, तरच कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये व वैद्यकीय महाविद्यालयात भरती करावे. ही सेवा अगदी थोड्या रुग्णांना लागण्याची शक्यता आहे.
 
आज कुठल्याही आजाराचा रुग्ण कुठेही भरती होऊ शकतो. साधा सर्दी, पडशाचा रुग्ण कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये भरती होतो आणि लाखभर बिल करून घेतो. मंत्री, राजकारणी, भ्रष्ट समाजसेवक व नवश्रीमंत यांनी महागडी कॉर्पोरेट हॉस्पिटल्स गच्च भरलेली असतात. आजार मोठा नसला तरी अशा रुग्णांचा आर्थिक व सामाजिक दर्जा मोठा असतो.असे हे एक दुष्टचक्र आहे. या सर्व गोष्टींमुळे चांगल्या ‘फॅमिली डॉक्टर्स’ची गरज पुन्हा वाढली आहे. ‘जनरल प्रॅक्टिस’ आणि ‘फॅमिली फिजिशियन’ ही देखील एक प्रकारची वैद्यकीय स्पेशालिटी आहे. ‘फॅमिली डॉक्टर’ला सर्व वैद्यकीय विषयांचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ‘हिस्ट्री’ व तपासणीवर अचूक निदान करण्याची क्षमता आवश्यक आहे. निदान पक्के झाल्यावर पुढील उपचार देणे सोपे जाते. आजारांच्या निदान व उपचार याशिवाय लसीकरण, कुटुंब नियोजन, साथीच्या आजारांचा नियंत्रणाबद्दल लोकशिक्षण, दुर्धर आजारात रुग्णास व त्यांच्या नातेवाईकांस दिलासा देणे इत्यादी अनेक कामे चांगला ‘फॅमिली डॉक्टर’ करू शकतो.
 
इंग्लंडमध्ये सार्वजनिक आरोग्य, ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस’तर्फे पाहिले जाते. प्रत्येक नागरिकाचा आरोग्य विमा असतो व त्यास त्याच्या विभागातील ‘फॅमिली डॉक्टर’ नेमून दिलेला असतो. हा ‘फॅमिली डॉक्टर’ रुग्णास मोफत औषधे देतो. आजार मोठा असल्यास वा ऑपरेशनची गरज असल्यास ‘फॅमिली डॉक्टर’ रुग्णास स्पेशालिस्टकडे पाठवितो. तेथे ‘फॅमिली डॉक्टर’च्या सल्ल्याशिवाय स्पेशालिस्टकडे जाता येत नाही. आपल्याकडे दुर्दैवाने ‘फॅमिली डॉक्टर’ हा वैद्यकीय सेवेचा महत्त्वाचा घटक आहे, हेच मानले जात नाही. साध्या आजारासाठीदेखील रुग्ण इस्पितळ गाठतात व दु:खी होतात.गेली ४० वर्षे मी ‘फॅमिली डॉक्टर’ म्हणून प्रॅक्टिस केली याचा मला अभिमान वाटतो. यातील पहिली १८ वर्षे मी औद्योगिक वसाहतीत व अनधिकृत बांधकामाच्या गराड्यात प्रॅक्टिस केली. पदव्युत्तर शिक्षण असतानादेखील माझी फी मी अत्यल्प ठेवली. अनेक लहान मुलांचे आजार मी प्राथमिक स्वरुपात बरे करून त्यांची हॉस्पिटलवारी टाळली. गलिच्छ वस्तीत ‘लसीकरण व क्षयरोग नियंत्रण’ हे कार्यक्रम प्रभावीपणे राबविले.
 
विपुल वैद्यकीय लिखाण करून लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. काही कुटुंबांतील तिसर्‍या पिढीला मी आज आरोग्य सेवा देत आहे. ज्या तरुण जोडप्यांनी नवीन संसार थाटला होता, त्यांच्या मुलांवर मी पूर्वी उपचार केले, आज मी त्यांच्या नातवंडांवर उपचार करत आहे. गेल्या तीन पिढ्यांतील हा ऋणानुबंध आहे. ‘फॅमिली डॉक्टर’ म्हणून मला आर्थिक श्रीमंती तर लाभली, पण त्याहीपेक्षा मला लाभलेली अनुभवाची श्रीमंती अधिक महत्त्वाची वाटते.


 
डॉ. मिलिंद शेजवळ