लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये कामिल नावाच्या तरुणाने आपले नाव आणि धर्म लपवून इंस्टाग्रामवर एका मुलीशी मैत्री केली. त्यानंतर त्याने मुलीला ब्लॅकमेल करून वर्षभर तिचे लैंगिक शोषण केले. या काळात कामिल आणि त्याच्या कुटुबियांनी मुलीवर धर्मांतर करण्यास, नमाज अदा करण्यास आणि गोमांस खाण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दि. १८ मे रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडिता हरियाणातील जींद जिल्ह्यातील रहिवासी आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी तिची ओळख इंस्टाग्रामवर कमल नावाच्या तरुणाशी झाली. वास्तविक, कामिलनेच कमल नावाने आयडी बनवला होता. कामिलने तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. सोशल मीडियावरील संभाषणे हळूहळू फोन कॉल्स आणि मेसेजपर्यंत वाढू लागली. लग्नाच्या नावाखाली त्याने पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. तसेच पीडितेसोबत शारीरिक संबंधही ठेवले. याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही बनवले. सुमारे एक वर्षापूर्वी कामिलने मुलीला त्याच्यासोबत येण्यास सांगितले. आणि तसे न केल्यास तिचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिला कुठेही चेहरा दाखवता येणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली होती.
एवढेच नाही तर कामिलने आपल्या भावाला जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. कामिलने तिला मुझफ्फरनगरमधील मन्सूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील संधवली गावात येण्यास सांगितले आणि तिचे दागिने वगैरे आणण्यास सांगितले. मुलीचे म्हणणे आहे की, भीतीपोटी तिने पैसे आणि दागिने घेऊन घर सोडले.पीडित तरुणी म्हणाली की, “त्याच्यासोबत आल्यानंतर त्याने मला एक वर्ष त्याच्या घरी ठेवले. यादरम्यान तो बलात्कार करायचा. त्याला आणि त्याच्या कुटुंबाकडून मला मारहाण आणि शोषण झाले. त्यांनी मला मुस्लिम होण्यास भाग पाडले. तो म्हणायचा - मुस्लिम व्हा, बुरखा घाला, नमाज अदा करा, उर्दू शिका. त्यांनी मला गोमांस वगैरे खायला देण्याचाही प्रयत्न केला. तो माझ्यावर जबरदस्ती करत होता.”
आरोपींच्या तावडीतून सुटका झालेल्यानंतर पीडितेने दि. १८ मे रोजी हिंदू संघटनांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यानंतर हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीडितेबाबत एसएसपींची भेट घेतली. संपूर्ण प्रकरण ऐकून घेतल्यानंतर एसएसपींनी गुन्हा दाखल करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी कामिलविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.