"निवडणूक कशी लढवतात आणि मतमोजणी कशी होते हे राऊतांनी शिकून घ्यावं!"
02-May-2024
Total Views |
मुंबई : निवडणूक कशी लढवली जाते आणि मतदान कसं मोजलं जातं, हे संजय राऊतांनी कधीतरी शिकून घ्यावं, असा सल्ला भाजप आमदार नितेश राणेंनी दिला आहे. ते गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
नितेश राणे म्हणाले की, "प्रत्येक गोष्टीकडे संशयाच्या दृष्टीकोनातून पाहणं ही संजय राजाराम राऊतांची जूनी सवय झालेली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून ते उगाच आपल्या अकलेचे तारे तोडत होते. निवडणूक आयोगाने त्यांच्या मनाप्रमाणे वागावं अशी त्यांची ईच्छा असते. त्यांनी स्वत: साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही आणि ते निवडणूक आयोगाला सल्ले देत आहेत. निवडणूक आयोगाचा रिपोर्ट एवढ्या उशीरा का आला, हा प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार संजय राऊतांना आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
"महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या दिशा सालियानच्या खुनाचा पोस्टमार्टम रिपोर्ट योग्यवेळी का आला नाही, हा प्रश्न आम्हीदेखील विचारायचा का? त्यांना प्रत्येक गोष्टीवर संशयच घ्यायचा असेल तर दिशा सालियानच्या रिपोर्टवर आम्ही प्रश्न विचारायला हवा," असे ते म्हणाले. तसेच निवडणूक कशी लढवली जाते, मतदान कसं मोजलं जातं, हे आपण कधीतरी शिकून घ्यायला हवं, असा सल्लाही राणेंनी राऊतांना दिला.
उद्धव ठाकरेंवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "एकीकडे उद्धव ठाकरे सांगतात की, आम्हाला शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनवायचं आहे. पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. यातून उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांवर किती प्रेम आहे आणि ते किती स्वार्थी आहेत, हे पुढे आलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा महाराष्ट्राला दाखवला. त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी किंवा बाळासाहेबांच्या विचारांशी काहीही देणंघेणं नाही," असेही ते म्हणाले.