डबेवाला कामगार पुतळा हटविणार नाही : बीएमसी

मुंबई महानगरपालिकेचे स्पष्टीकरण

    02-May-2024
Total Views |

dabewala


मुंबई, दि.२ :  
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हाजीअली चौक वाहतूक बेटावर मुंबईचा डबेवाला कामगार यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. मात्र पालिका वाहतूक बेट सुशोभीकरण करत असतानाच त्याभागातील डबेवाला कामगार पुतळा हटविणार असल्याचा संशय डबेवाला संघटनेने व्यक्त केला होता. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महानगरपालिकेला पुतळा हटविण्यात येऊ नये याबाबत पत्रव्यवहार केला. याबाबत माहिती देताना 'हा आयकॉनिक पुतळा कुठेही हटविण्यात येणार नाही. तसेच, डबेवाला कामगारांच्या मागणीनुसारच या वाहतूक बेताचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणावरून हा पुतळा झाकून ठेवल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिका सहायक आयुक्त डी. विभाग यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते की, मुंबई ही कामगारांची नगरी म्हणूनही ओळखली जाते. मुंबईतील नागरिकांना घरचे स्वादिष्ठ व रुचकर जेवण त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचवण्याचे काम हे मुंबईच्या डबेवाले मोठ्या शितफीने करतात. मुंबईतील डबेवाला कामगारांचा सन्मान म्हणून हाजी अली परिसरात 'डबेवाला कामगारांचा पुतळा' बृहन्मुंबई मनपा द्वारे काही दिवसांपूर्वी बसविण्यात आलेला आहे. हा पुतळा हटविण्यात येण्याचा संशय या मुंबई डबेवाला असोसिएशन व्यक्त केला आहे आहे. बृहन्मुंबई मनपातर्फे हा पुतळा न हटविण्यात येऊन डबेवाला कामगारांचा सन्मान राखला जाईल याबाबत योग्य त्या उपाययोजना आपल्या स्तरावरून करण्याबाबत योग्य ते सहकार्य करण्यात यावे, अशी मागणी लोढा यांनी पत्राद्वारे केली आहे.

हा पुतळा सुरक्षिततेच्या कारणामुळे झाकून ठेवण्यात आला आहे. सध्या या वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाच्या काम सुरु आहे. वास्तविक डबेवाला कामगार संघटनांनी या वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी केली होती. या कामादरम्यान पुतळ्याला धक्का लागू नये, धूळ आणि कामादरम्यान वापरण्यात येत असलेल्या केमिकलचा पुतळ्यावर परिणाम होऊ नये म्हणून हा पुतळा झाकून ठेवण्यात आला आहे. हा पुतळा कुठेही हटविणार नाही. सुशोभीकरणाच्या कामानंतर हा पुतळा पुन्हा खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.