सौंदर्य, माधुर्य अन् चातुर्याचा त्रिवेणी संगम

    02-May-2024
Total Views |
 madhura devkate 
 
करिअर म्हणून ‘मेकअप आर्टिस्ट’कडे बघण्याचा खुद्द महिलांचा आणि बरेचदा समाजाचा दृष्टिकोन काहीसा संकुचितच. त्यावर मात करत, सौंदर्य, माधुर्य आणि चातुर्य यांचा त्रिवेणी संगम साधणार्‍या मधुरा देवकुटे यांच्याविषयी...
 
नोकरी सोडून एका वेगळ्याच क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता आणि धमक बर्‍याच महिलांमध्ये असते. हीच धमक दाखवली मधुरा देवकुटे यांनी. स्त्री सुंदर असतेच, पण तिच्यातील सौंदर्य अधिक खुलून येतं ते म्हणजे सौंदर्य प्रसाधनांमुळे आणि त्यांचा खरं तर योग्य वापर आपल्याला शिकवतात त्या मेकअप आर्टिस्ट. नोकरी सांभाळून मेकअप शिकण्याची आवड जोपासणार्‍या मधुरा देवकुटे यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया...
 
मधुरा यांचे बालपण डोंबिवलीमध्ये गेले. पहिली ते पाचवीपर्यंतचे शालेय शिक्षणाचे धडे मधुरा यांनी डोंबिवलीत गिरवले. त्यानंतर काही कारणास्तव त्यांचा मुक्काम डोंबिवलीहून ठाण्याला आला. सहावीपासूनचे पुढचे शिक्षण त्यांनी ठाण्यात पूर्ण केले. शालेय शिक्षणानंतर मधुरा यांनी अकरावी-बारावी वाणिज्य शाखेतून, तर त्यापुढील पदवीचे शिक्षण केळकर महाविद्यालयातून, कला शाखेतून पूर्ण केले. पुढे मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी ‘समाजशास्त्र’ विषयाची निवड केली. मधुरा यांना जरी लहानपणापासूनच मेकअप ही कला शिकण्याची जरी आवड असली, तरी त्यासाठीचे औपचारिक शिक्षण किंवा त्या कलेबद्दल अधिक माहिती देणार्‍या कोणत्याही क्लासमध्ये त्यांनी प्रवेश केला नाही. पण, ही आवड जोपासावी, असे कायम मधुरा यांना वाटे. मधुरा यांच्या आईनेही “तुला ज्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यात कष्ट करून नाव कमव,” म्हणत त्यांना पुरेपूर पाठिंबाही दिला.
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मधुरा यांनी मेकअप क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले. त्यासाठी जे शिक्षण आवश्यक आहे, ते घेण्याचादेखील त्यांनी निर्णय घेतला. पण, सामान्य कुटुंबांत जी मोठी अडचण असते, ती मधुरा यांच्याही वाट्याला आली; ती म्हणजे आर्थिक चणचण! आपल्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करणे, हे सामान्य माणसासाठी तितकेसे सोपे नाही, हे मधुरा यांनाही उमगले. मेकअप क्लासेसची फी भरण्यासाठी त्यांनी आयात-निर्यात क्षेत्रात नोकरी धरली. एकीकडे दरमहिन्याला रोखरक्कम पगाराच्या स्वरूपात हाती येत होती, तर दुसरीकडे त्यांनी डोेंबिवलीतीलच एका ब्युटी पार्लरमध्ये शिकण्यास सुरुवात केली. दोन महिने त्या पार्लरमध्ये काम केल्यानंतर मधुरा यांना आपल्याला केवळ मेकअप करण्यात रस आहे, हे जाणवले आणि त्यापद्धतीने आपल्याला कोण शिकवेल, यासाठी आपल्या गुरुच्या शोधात त्या निघाल्या. पुढे एका छायाचित्रकार मित्राच्या ओळखीने त्यांना अनुराधा रमन यांच्या रूपात प्रोफेशनल मेकअप शिकण्याची संधी मिळाली.
 
नोकरी करत मधुरा मेकअप शिकत होत्या आणि त्यानंतर स्वत: एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करण्यास त्यांनी कालांतराने सुरुवात केली ती लग्नसराईपासून. हळूहळू त्यातून पुरेसे अर्थार्जन होत आहे, याची खात्री पटल्यानंतर मधुरा यांनी हिंमत करून चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि पूर्णवेळ त्या ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम करू लागल्या. पण, मधुरा यांच्या डोक्यात ‘मेकअप’ची व्याख्या निराळी होती. नैसर्गिकरित्या स्त्री जितकी सुंदर आहे, तितकेच तिचे सौंदर्य खुलवून दाखवण्याची कला त्यांच्या हातांमध्ये होती आणि त्यानुसार पुढे मधुरा यांनी ‘मेकअप’ क्षेत्रात ‘नॅचरल मेकअप लूक करणारी मेकअप आर्टिस्ट’ अशी आपली ओळख निर्माण केली.
 
लग्नसराईपासून सुरू केलेला ‘मेकअप आर्टिस्ट’चा प्रवास पुढे मधुरा यांना ‘सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट’पर्यंत घेऊन आला. मधुरा यांनी पहिल्यांदाच आपले प्रोफेशनल काम यू-ट्युबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिच्या सोबत केले. प्राजक्ताच्या वेब सीरिज, ‘जुग जुग जियो’ या तिच्या पहिल्या चित्रपटातदेखील मधुरा यांनी तिच्या ‘पर्सनल मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम पाहिले. सध्या मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींसाठी त्या ‘मेकअप आर्टिस्ट’ म्हणून काम पाहत आहेत. परंतु, आपणही या समाजाचे काही देणे लागतो, याची जाणीव ठेवून तरुण मुली किंवा गृहिणींना त्या माफक दरात कोरोनाकाळापासून मेकअपचे धडे देत आहेत. नटणं, तयार होणं, मेकअप करणं, ही प्रत्येक स्त्रीची आवड. पण, पैशांअभावी किंवा अन्य कारणांमुळे ‘प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट’कडून तयार होता येत नाही. अशा महिलांसाठी मधुरा दोन-तीन दिवसांचे ‘सेल्फ मेकअप सेशन्स’ घेतात. गेली सहा वर्षे त्या ‘सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट’ म्हणूनही कार्यरत असून, या क्षेत्रात येऊ पाहणार्‍यांना, या क्षेत्रात येताना कोणत्या बाबी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत, आर्थिक गणितं कशी बसवली पाहिजेत, याचेही धडे त्या देतात.
 
मधुरा यांचा प्रवास ज्या स्त्रियांना स्वत:च्या मेहनतीवर त्यांचा कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तो कसा करावा, त्यासाठी लागणारे भांडवल कसे स्वकष्टाने उभे करावे, हे शिकवणारा नक्कीच आहे. बर्‍याचदा आपली कला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन होईल का, असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित करते, त्यावेळी मधुरा देवकुटे यांच्यासारख्या असंख्य महिलांची यशोगाथा आपल्यासमोर या प्रश्नाचे उत्तर आणि यश ठेवून जाते. मधुरा देवकुटे यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीस ’दै. मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!