'मुंबई पुणे मुंबई ४' लवकरच येणार; मुक्ताने दिली हिंट, म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
17-May-2024
Total Views |
सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई ४ लवकरच येणार
मुंबई : मराठी प्रेक्षकांचा ऑल टाईम आवडता चित्रपट म्हणजे ‘मुंबई-पुणे-मुंबई’ (Mumbai-Pune-Mumbai Movie). सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाच्या तिनही भागांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं. त्यातही अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या जोडीने तर अधिकच कमाल केली. आता मुंबई-पुणे-मुंबई ४ कधी येणार असा प्रश्न प्रेक्षक विचारु लागले आहेत. याच प्रश्नाचे उत्तर मुक्ता बर्वे हिने देत लवकरच चित्रपट येणार असल्याची हिंट दिली आहे. सध्या मुक्ता (Mukta Barve) 'नाच गं घुमा' या चित्रपटामुळे चर्चेत असून तिचं चारचौघी नाटक देखील तुफान सुरु आहे.
नुकतीच तिने महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाबद्दल वक्तव्य केले.'मुंबई पुणे मुंबई'च्या पहिल्या भागात आपली गौरी आणि गौतम या दोघांशी ओळख झाली. काही वर्षांनी आलेल्या दुसऱ्या भागात या दोघांचं लग्न झालं. तर तिसऱ्या भागात ते आईबाबा झाले. आता चौथा भाग कधी येणार याबद्दल मुक्ता म्हणाली, "आम्ही तिघंही म्हणजे मी, स्वप्नील आणि सतीश एकमेकांचीच वाट पाहत आहोत. सगळे काय आता कधी येणार असंच विचारतात. मग हो, लवकरच असं आम्ही एकमेकांना म्हणतो. प्रेक्षकांना चौथा भाग हवा आहे आणि आम्हालाही करायचाच आहे. कारण हा असा चित्रपट आहे.ज्याच्यासोबत लोकं जगत आहेत. त्यात जे घडतंय ते अगदी खरं असल्यासारखंच लोकांना वाटतं. म्हणजे गौतम आणि गौरी यांचं वेगळं आयुष्य सुरुच आहे अशी लोकांची भावना असते."
मुक्ता पुढे म्हणाली, "जेव्हा जेव्हा मला प्रेक्षक भेटतात तेव्हा मुंबई पुणे मुंबई बद्दल हेच सांगतात की आम्हीही असेच भेटलो होतो, असेच प्रेमात पडलो होतो. आता पुढे काय होणार आहे सिनेमात असं विचारतात. तेव्हा मी म्हणते जे तुमचं खऱ्या आयुष्यात होणार तेच...खरंच प्रेक्षकांचं सिनेमाशी फारच गंमतीशीर आणि घट्ट नातं जुळलं आहे. सतीशला मी सांगते की लवकर मनावर घे आता."