जॉन पॉल जोन्स आणि ‘बॉनहोम रिचर्ड’

    17-May-2024
Total Views |
John Paul Jones and Bonhomme Richard
 
ब्रिटनच्या उत्तरेकडील ‘नॉर्थ सी’ या सागरी भागात जॉन पॉल जोन्स फिरत होता. ‘बॉनहोम रिचर्ड’ या जहाजावर तो होता आणि त्याच्या टेहळ्यांनी त्याला खबर दिल्ली की, स्कँडिनेव्हियन सागराकडून नौदल सामग्रीने भरलेल्या काही बोटी ब्रिटनकडे जात आहेत नि त्यांच्या संरक्षणासाठी फक्त दोन युद्धनौका आहेत. हे म्हणजे घबाडच होतं. जॉन पॉल ताबडतोब ब्रिटिश काफिल्याच्या मागावर निघाला.

राजकारणात कुणीही कायमचे शत्रू नसतात आणि कायमचे मित्र नसतात. राजकीय संबंध बदलत असतात. ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका हे आज अगदी घट्ट मित्र आहेत. गेल्या दोन महायुद्धांमध्येही ते मित्र होते. पण, त्यापूर्वी तशी स्थिती नव्हती. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात सतत स्पर्धा, चुरस आणि लढाया चालू असत. अमेरिका हे ब्रिटनचंच पिल्लू, पण अमेरिकन वसाहती आपला मायदेश ब्रिटनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्धासाठी खड्या झाल्यावर अमेरिकन क्रांतिसैन्याला फ्रान्स, स्पेन, हॉलंड या सगळ्यांनी भरपूर मदत केली.मानवाच्या आधुनिक काळाच्या इतिहासात फे्रंच राज्यक्रांती आणि अमेरिकन राज्यक्रांती या दोन घटनांना फार महत्त्व आहे. फे्रंच राज्यक्रांतीचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री दिली, तर अमेरिकन राज्यक्रांतीने लोकशाही राज्यव्यवस्थेच्या युगाची नांदी केली.अमेरिकन राज्यक्रांतीची प्रत्यक्ष सुरुवात सन 1775 साली झाली आणि सन 1783 साली पॅरिसच्या तहाने ती संपली, म्हणजे त्या तहात ब्रिटनने ‘युनायटेड नेशन्स ऑफ अमेरिका’ या राष्ट्राचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व मान्य केले. या काळात आपल्याकडे हिंदवी स्वराज्य वैभवाच्या सर्वोच्च शिखरावर होते. सवाई माधवराव हे पेशवे होते आणि नाना फडणीस व महादजी शिंदे संपूर्ण हिंदुस्थानावर मराठी सत्तेचा अंमल रेटून बसवलेला होता.
 
आपल्याकडे ज्याप्रमाणे ‘गड आला पण सिंह गेला’ किंवा ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ इत्यादी उद्गार फार विख्यात आहेत. तसेच अमेरिकन क्रांतीच्या इतिहासातले ‘मला स्वातंत्र्य द्या, नाहीतर मरण द्या’ व ‘मी अजून लढायला सुरुवातच केलेली नाही,’ हे दोन उद्गार अतिशय विख्यात आहेत. वेळोवेळी त्यांचे संदर्भ दिले जात असतात.यापैकी ‘मला स्वातंत्र्य द्या, नाहीतर मरण द्या,’ हे उद्गार पॅट्रिक हेन्री या अमेरिकन नेत्याचे आहेत. मार्च 1775 मध्ये व्हर्जीनिया प्रांताच्या प्रतिनिधी सभेत भाषण करताना त्याने हे उद्गार काढले होते. अमेरिकन जनता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती आतुरली आहे, हे त्याच्या या उद्गारांमधून अतिशय प्रभावीपणे प्रतिबिंबित झाल्यामुळे त्याचं हे वाक्य नंतर क्रांतिकाळात अतिशय प्रेरणादायी, स्फूर्तीदायी ठरलं आणि अजरामर झालं.‘मी अजून लढायला सुरुवातच केलेली नाही,’ या वाक्यामागे तर चित्तथरारक इतिहास आहे आणि जो जॉन पॉल जोन्स व बॉनहोम रिचर्ड यांच्याशी जाऊन भिडतो.जॉन पॉल हा इसम मूळचा स्कॉटिश. वयाच्या 12व्या वर्षी तो व्यापारी गलबतावर खलाशी म्हणून चिकटला. दर्यावर्दी व्यवसायातली सगळी कौशल्ये भराभर आत्मसात करीत वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी तो जहाजाचा कप्तान बनला. पण, एकदा जहाजावरच्या खलाशांनी बंड केलेलं असताना त्या बंडाचा म्होरक्या जॉनच्या हातून ठार झाला.
 
खटल्याचं झंझट चुकवायला तो पळाला आणि वेस्ट इंडिज बेटं, अमेरिका या भागात लपून-छपून दिवस काढू लागला. त्याने आपलं नावही जॉन पॉल जोन्स असं बदललं.अशी दोन वर्षे गेली आणि अमेरिकन क्रांतियुद्ध सुरू झालं. क्रांतिसेनेला उत्तम दर्यावर्दी लढवय्ये हवेच होते. जॉन पॉल जोन्स फिलाडेल्फियाला गेला आणि क्रांती सैन्यात भरती झाला. अमेरिकन क्रांती सैन्याचं नाविकदळ अगदीच छोटं होतं. पण, त्याची ध्वजनौका आल्फ्रेड व कमांडर हॉपकिन्स याच्या हाताखाली लेफ्टनंट म्हणून जॉन पॉल जोन्सची नेमणूक झाली. आणि मग जॉनने आपली कर्तबगारी दाखवायला सुरुवात केली. वास्तविक, त्या काळात ब्रिटन ही एक नाविक महासत्ता होती. ब्रिटनच्या जबरदस्त नौदलासमोर फ्रान्स, स्पेन, हॉलंड, डेन्मार्क अशा भारीभारी नौदलांनी पांढरे बावटे फडकवले होते. अशा त्या काळात जॉन पॉल जोन्सने ‘आल्फ्रेड’ ध्वजनौकेवरून वेस्ट इंडीज बेटांमधल्या बहामा बेटांच्या अवतीभवती जोरदार धुमाकूळ घातला. ब्रिटनचं नौदल त्याने हैराण करून सोडलं. साहजिकच, त्याला ताबडतोब बढती मिळाली. कप्तान या नात्याने ’प्रॉव्हिडन्स’ नावाचं एक भलंभक्कम जहाज पूर्णपणे त्याच्या ताब्यात देण्यात आलं. मग तर तो पुरा सुटलाच. बहामा ते नोव्हा स्कॉशिया एवढ्या लांबलचक अटलांटिक समुद्रपट्ट्यात त्याने अल्पावधीत आठ ब्रिटिश जहाजे पकडून शरण आणले नि आणखी आठ जाळून बुडवली. ब्रिटिश नौदल हादरून गेलं.
 
अर्थात, ब्रिटिश नौदलाशी समोरासमोर टक्कर देण्याची ताकद आपल्याकडे नाही, हे जॉनलाही माहीत होते आणि क्रांती सैन्याचा नौदलप्रमुख कमांडर हॉपकिन्स यालाही माहीत होतं. मग, त्यांनी नवीन योजना आखली. जॉन पॉलने खुद्द ब्रिटिश बेटं आणि आसपासच्या समुद्रात फिरत राहायचं नि जमेल त्या मार्गाने ब्रिटिश नौदलाचे चावे घेत राहायचं. मिळतील त्या गावांवर, बंदरांवर हल्ले करून ती जाळून टाकायची. तडाख्यात सापडतील तेवढी ब्रिटिश व्यापारी जहाजं लुटायची. थोडक्यात, ब्रिटनला हैराण करत राहायचं.ही योजना भलतीच यशस्वी झाली. जॉनने आयर्लंड आणि इंग्लंड यांची किनारपट्टी हैराण करून सोडली. ब्रिटनने अर्थातच त्याला ‘चांचा’ म्हणजे ‘समुद्री डाकू’ म्हणून जाहीर केलं आणि अशातच 23 सप्टेंबर 1779 हा दिवस उजाडला. ब्रिटनच्या उत्तरेकडील ’नॉर्थ सी’ या सागरी भागात जॉन पॉल जोन्स फिरत होता. ‘बॉनहोम रिचर्ड’ या जहाजावर तो होता आणि त्याच्या टेहळ्यांनी त्याला खबर दिल्ली की, स्कँडिनेव्हियन सागराकडून नौदल सामग्रीने भरलेल्या काही बोटी ब्रिटनकडे जात आहेत नि त्यांच्या संरक्षणासाठी फक्त दोन युद्धनौका आहेत. हे म्हणजे घबाडच होतं. जॉन पॉल ताबडतोब ब्रिटिश काफिल्याच्या मागावर निघाला.
 
23 सप्टेंबरच्या संध्याकाळी जॉन पॉलची ‘बॉनहोम रिचर्ड’ आणि प्रमुख ब्रिटिश संरक्षणनौका ‘एच. एम. एस. सेरापीस’ यांची समोरासमोर गाठ पडली. अत्यंत घनघोर अशा लढाईला सुरुवात झाली. ब्रिटिश खलाशी हे अर्थातच जास्त कुशल लढवय्ये होते. उत्कृष्ट बर्कंदाज होते. ब्रिटिश तोपचींच्या अचूक नेमबाजीमुळे ‘बॉनहोम रिचर्ड’ला ठिकठिकाणी भगदाड पडली. तिच्यावरच्या अनेक तोफा बंद पडल्या. तिच्या अप्पर डेकवर एकही शीड, डोलकाठी, तोफ, माणूस उभं असं शिल्लक उरलं नाही. उभे तेवढे पडे आडवे, अशी स्थिती झाली. सेरापीस जहाजही ठिकठिकाणी फुटलं होतं. त्याचं मुख्य शीड खलास झालं होतं. पण, रिचर्डपेक्षा त्याची स्थिती बरी होती. मग जॉन पॉल रिचर्डच्या लोअर डेकवर गेला नि तिथे शिल्लक राहिलेल्या तीन तोफांमधून ‘सेरापीस’वर भडिमार करू लागला. पण, कप्तान दिसेनासा झाल्यामुळे जॉनच्या दोघा दुय्यम अधिकार्‍यांना वाटलं की, तो ठार झाला. यामुळे त्यांनी ‘बॉनहोम रिचर्ड’वरचं निशाण खाली उतरवलं. ही शरणागतीची खूण असते. ते पाहताच जॉन पॉलचं पित्त खवळलं. तो धावत अप्पर डेकवर आला आणि त्याने सरळ कमरेचं पिस्तुल काढून दोघांपैकी एका दुय्यमावर झाडलं. आपल्या कप्तानाचा तो आवेश पाहून ते दोघे घाबरले नि समुद्रात उड्या टाकण्यासाठी कठड्याकडे पळू लागले. त्यामुळे जॉन पॉलचा नेम चुकला. पण, तो इतका पिसाळला होता की, त्याने जोरात पिस्तुलच फेकून मारलं आणि ते डोक्यात बसून एकाची कवटीच फुटली.
 
हा सगळा तमाशा पाहून समोरचा ‘सेरापीस’वरचा ब्रिटिश कप्तान हसला आणि त्याने जोराने ओरडून जॉन पॉलला शरण येण्यास फर्मावलं. यावर जॉन पॉल जोन्स त्याच्या चौपट जोरात ओरडला, ’‘शरण येऊ? मी तर अजून लढाईला सुरुवातच केलेली नाही!” आणि केवळ तीन तोफांनिशी त्याने ‘सेरापीस’वर त्वेषाने गोलंदाजी सुरू केली. जहाजाला जहाज भिडलं. दोरखंड इकडून तिकडे भिरकावले जाऊ लागले. तोफा आणि बंदुकांच्या कडकडाटाच्या जोडीला आता तलवारींचा खणखणाट सुरु झाला आणि अखेर जॉन पॉलच्या सैनिकांनी लढाई जिंकली. नौदल सामग्रीने भरलेल्या जहाजांसह, ‘सेरापीस’ हे मोठं नि ‘काउंटेस ऑफ स्कारबरो’ हे छोटं अशी दोन संरक्षक लढावू जहाजं, असं घबाड जॉनच्या हाती पडलं. ‘जॉनहोम रिचर्ड’ जहाज मात्र बुडालं. मग जिंकलेल्या ‘सेरापीस’वरून जॉन पॉल प्रथम हॉलंडला नि तिथून पॅरिसला गेला. फ्रान्स हा अमेरिकेचा मुख्य मित्रदेश. त्यामुळे पॅरिसमध्ये जॉनचं शाही स्वागत झालं. राजा सोळाव्या लुुईने त्याला मानाची तलवार आणि सरदारकी बहाल केली. जॉन पॉल जोन्सच्या जीवनातला हा सर्वोच्च काळा होता.
 
मात्र, यानंतर अमेरिकन स्वातंत्र्ययुद्घात म्हणावी अशी समुद्री लढाई झालीच नाही. 1783 साली पॅरिस तहान्वये ब्रिटनने अमेरिकन सार्वभौमत्वाला मान्यता दिली नि युद्घ संपलं. नवजात अमेरिका देशाकडे पुरेसा पैसा नसल्यामुळे बलवान नौदलाचा विकास हा मुद्दा दुय्यम क्रमावर ठेवण्यात आला. साहजिकचं जॉन पॉल जोन्सच्या कर्तृत्वाला फारसा वाव उरला नाही. तेवढ्यात रशिया या अमेरिकेच्या त्यावेळच्या मित्रदेशाकडून चांगल्या नौदल सेनापतीची मागणी आली. रशियात त्यामुळे ‘कॅथराईन द ग्रेट’ ही जहांबाज बाई सम्राज्ञी होती. नि तिला काळ्या समुद्राच्या तुर्की नौदलाचा बंदोबस्त करायचा होता. म्हणून जॉन पॉल जोन्सला तिकडे धाडण्यात आलं. कामगिरी त्याने फत्ते केली, पण एका बार्ईच्या लफड्यात सापडून तो खूप बदनाम झाला नि निराश अवस्थेत 1792 साली पॅरिसमध्ये मेला. तिथेच त्याला दफन करण्यात आलं.पुढे 1905 साली अमेरिकेत थिओडोर रूझवेल्ट हा राष्ट्रध्यक्ष झाला. रूझवेल्टने आधुनिक अमेरिकन नौदलाला खर्‍या अर्थाने बलवान केलं. त्यामुळे जॉन पॉल जोन्सच्या कामगिरीची नेमकी जाण त्याला होती. रूझवेल्टने 113 वर्षांनंतर जॉनची शवपेटी पॅरिसमधून खणून अमेरिकेत आणली आणि संपूर्ण शाही इतमामाने तिचं दफन अ‍ॅनापोलिस इथल्या अमेरिकन नौदलाच्या अधिकृत दफनभूमीत करण्यात आलं. या संपूर्ण समारंभात रूझवेल्ट जातीने हजर राहिला नि, ‘अमेरिकन नौदलाचा जनक’ या शब्दात त्याने जॉन पॉल जोन्सचा गौरव केला.आता अमेरिकन नौदलातर्फे कॅप्टन रिंगेलबर्ग हा ‘बॉनहोम रिचर्ड’ हे जॉन पॉल जोन्सचं 245 वर्षांपूर्वी बुडालेलं जहाज शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आहे.
 
 
मल्हार कृष्ण गोखले