नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा! आनंद आश्रमालाही देणार भेट
11-May-2024
Total Views | 54
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायूतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होणार आहे. रविवार, १२ मे रोजी ही सभा पार पडेल. दरम्यान, यावेळी राज ठाकरे आनंद दिघेंच्या आश्रमात जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात ठाण्यात मतदान होणार आहे. याठिकाणी महायूतीने शिवसेनेचे नरेश म्हस्के तर महाविकास आघाडीने उबाठा गटाचे राजन विचारे यांना उमेदवारी दिली. यातच आता नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत.
दरम्यान, या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे असून याठिकाणी शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी राज ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आनंद आश्रमालाही भेट देणार आहेत. शिवसेना सोडल्यानंतर ते पहिल्यांदाच आनंद दिंघेच्या आश्रमाला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरेंनी महायूतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याआधी त्यांनी कोकणात नारायण राणे आणि पुण्यातील महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. त्यानंतर आता त्यांची ठाण्यातही सभा होणार आहे. यावेळी ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.