_202405012108090138_H@@IGHT_392_W@@IDTH_696.jpg)
नाकापेक्षा मोती जड’ व्हायला लागला, की तो अलगद बाजूला काढावा लागतो, अन्यथा इजा होण्याची भीती असते. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी हीच नीती अवलंबत एका महिला सहकार्याला अलगद बाजूला केले, तेही तिला थांगपत्ता लागू न देता. होय, वर्षा गायकवाड. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यापासून मुंबईबाहेर त्यांची ओळख पोहोचली आणि त्याचा फायदा करून घेत, त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या राजकारणात शिरकाव केला. वरिष्ठ नेत्यांसमोर हांंजी-हांजी करण्याची काँग्रेसची आजवरची संस्कृती. पण, गायकवाड ठरल्या मुंबईकर. ’अरे’ला ’कारे’ करणे हा इथल्या मातीतला गुणधर्म अंगीकारून, त्यांनी प्रदेशाध्यक्षापासून ते सर्व वरिष्ठ नेत्यांचा रोष ओढवून घेतला. त्यात भर म्हणजे भाई जगताप यांना बाजूला करून मुंबईच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधक आणखीनच रागे झाले आणि तेथून गायकवाड यांचे पंख छाटण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरू झाला. मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दिकी यांच्यासारखे माजी मंत्री काँग्रेस सोडून जाण्यास सर्वस्वी वर्षा गायकवाड यांचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा अहवाल न मागता हायकमांडपर्यंत पोहोचवणे असो किंवा मुंबई काँग्रेस सांभाळण्यास त्या किती असमर्थ आहेत, याबाबतचा प्रचार करणे, हा याच कार्यक्रमाचा भाग. इतके करून न थांबता, मविआच्या जागावाटपाच्या चर्चांवेळी त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. किमान मुंबईतील उमेदवार तरी आपल्या मर्जीनुसार ठरवले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांना स्वतःला हवी असलेली दक्षिण मध्य मुंबईची जागासुद्धा ठाकरे गटाला सोडत गायकवाड यांची कोंडी करण्यात आली. त्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची त्यांनी हायकमांडकडे तक्रार केली, पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे पंख छटाईच्या कार्यक्रमाने जोर धरला आणि गायकवाड यांच्या गळ्यात उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी मारण्यात आली. या मतदारसंघात ना पक्षाचे केडर, ना एखाद्या आमदाराचे पाठबळ. त्यात नसीम खान आणि भाई जगताप यांनी पुकारलेला असहकार, अशा सर्व पडत्या बाजू विचारात घेता, वर्षा गायकवाड यांना ’बळीचा बकरा’ बनवून अलगद बाजूला करण्याचा काही नेत्यांचा ’प्लॅन’ असल्याची चर्चा पडद्यामागे रंगलेली दिसते.
रडत राऊत, रडत राव, घोड्यावर स्वार’ अशी एक प्रचलित म्हण. इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे, असा या म्हणीचा अर्थ. उत्तर मुंबईतील काँग्रेस उमेदवाराची अवस्था त्याहून वेगळी नाही. लाखभर मते मिळण्याची खात्री नसताना काँग्रेसने ही जागा स्वीकारली, त्यात विद्यमान केंद्रीय मंत्री आखाड्यात; अशावेळी मैदान सोडून पळाल्याचा संदेश बाहेर जाऊ नये, याच एकमेव उद्देशाने भूषण पाटील यांचे नाव घोषित करण्यात आले. या लोकसभा क्षेत्रातील सहापैकी किती विधानसभा मतदारसंघांत त्यांचे नाव परिचित आहे, हा संशोधनाचा विषय. याउलट उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला. अशावेळी विरोधी पक्षांपैकी कोणीही येथून लढण्यास तयार नसताना, ठाकरेंनी मोठ्या शिताफीने ही जागा काँग्रेसच्या गळ्यात मारली आणि अंग काढून घेतले. सुरुवातीला ठाकरे गटाकडून विनोद घोसाळकर इच्छुक होते. त्यांनी ताकदीचा अंदाज घेण्यासाठी काही विभागांत चाचपणी केली. ही संधी साधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी, उत्तर मुंबईच्या बदल्यात ठाकरे गटाने दक्षिण मध्य मतदारसंघ आपल्याला द्यावा, अशी आग्रही मागणी केली. परंतु, भाजपच्या गोयल यांच्यासमोर निभाव लागणार नसल्याची बाब हेरत ठाकरेंनी जागा बदलाचा प्रस्ताव धुडकावला. दुसरीकडे, लाखभर मते मिळतील, इतकीही ताकद नसताना उत्तर मुंबईत उमेदवार कोण द्यावा, असा पेच प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांसमोर निर्माण झाला. या मतदारसंघातील एकमेव काँग्रेस आमदार (मालाड पश्चिम) अस्लम शेख यांचे नाव पहिल्या टप्प्यात चर्चेला आले. परंतु, त्यांनी साफ नकार दिला. त्यात संजय निरूपम यांची हकालपट्टी केल्यानंतर पर्यायी चेहराच काँग्रेससमोर उरला नाही. त्यामुळे सहानुभूतीचे कार्ड खेळण्याच्या मनीषेने तेजस्वी घोसाळकर यांच्यासमोर काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु, त्यांनी फारसा रस दाखवला नाही. परिणामी, नाइलाजास्तव भूषण पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले. २००९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बोरिवली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. केवळ ३५ हजार मते मिळाल्याने ते तिसर्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यामुळे काँग्रेसने अगदीच अनोळखी उमेदवार दिल्याने गोयल यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाल्याची चर्चा आहे.
-सुहास शेलार