मुंबई : नुकतेच ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी महायूतीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
शिवसेनेच्या अधिकृत 'X' अकाऊंवर या दोन्ही नावांची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने कल्याणमध्ये उबाठा गटाच्या वैशाली दरेकर तर ठाण्यात राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात शिवसेना विरुद्ध उबाठा अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभेत २० मे रोजी मतदान पार पडणार आहे.
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena#LokasabhaElection2024pic.twitter.com/XYJjTUy0r8
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली होती. दरम्यान, आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण आणि ठाणे या दोन्ही मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे.