संशोधनात्मक संवर्धनाची पायाभरणी

    01-May-2024   
Total Views |

abc 
 
अनेक दुर्मीळ आणि नष्टप्राय प्रजातींवर संशोधनात्मक अभ्यास करणारे, धनेशाच्या प्रजाती तसेच काही ठरावीक प्रजातींच्या संवर्धनाचे काम गेली अनेक वर्षे करणार्‍या डॉ. रोहित नानिवडेकर यांच्या प्रवासाविषयी...
 
पर्यावरणाविषयी संवेदनशील असलेले, अनेक दुर्मीळ आणि नष्टप्राय प्रजातींवर संशोधनात्मक अभ्यास, तसेच या माध्यमातून त्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, या दृष्टीने गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्नशील असलेले डॉ. रोहित नानिवडेकर. रोहित यांचा जन्म १९८२ सालचा मुंबईतलाच. बालपणापासून दुसरीपर्यंतचं शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर आईची बदली झाल्यामुळे पुढे काही काळ त्यांचं शिक्षण अहमदाबादमध्ये झालं. आठवीपर्यंतचं शिक्षण तिथे पुणे केल्यानंतर पुन्हा मुंबईच्या हंसराज मुरारजी पब्लिक स्कूलमधून त्यांनी दहावी पूर्ण केली. अगदी लहानपणापासूनच निसर्गाविषयीच्या कुतूहलानेच मोठेपणी संवर्धनाची कास धरली. रोहित यांच्या काकांमुळे त्यांच्यात पक्षिनिरीक्षणाचं बाळकडू रुजलं असून, अगदी चौथ्या इयत्तेपासूनच त्यांनी पक्षिनिरीक्षणाला सुरुवात केली. दहावीनंतर जेव्हा करिअरचा विचार करण्याची वेळ आली, तेव्हा आपल्याला ‘वाईल्डलाईफ’ हाच विषय आवडतोय, हे लक्षात घेत त्यांनी त्या दृष्टीने वाट धरली.
 
दहावीनंतरही ज्युनिअर कॉलेजच्या काळामध्ये ते नागझिरा व्याघ्र गणना तसेच इतर ठिकाणीही पक्षिनिरीक्षणाची आवड म्हणून जात असत. बारावी पूर्ण करून पुढे त्यांनी माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात ‘बीएनएचएस’चे वेगवेगळे ‘बर्ड रिंगचिंग’चे प्रकल्प नंदुर मधमेश्वर भागात डॉ. बाला यांच्या निरीक्षणांतर्गत होत असत, त्यासाठी ही निरीक्षण करायला ते जात असत. यामध्ये पक्ष्यांचे स्थलांतर तसेच त्यांच्याबद्दलची शास्त्रीय माहिती कळू लागली. पदव्युत्तर पदवी ‘वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’मध्ये करायची, हे त्यांचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार त्यांना तिथे ‘फेलोशिप’ही मिळाली. आणि हीच त्यांचं आयुष्य बदलणारी संधी ठरली. ‘वाईल्डलाईफ इकोलॉजी’मध्ये पदव्युत्तर पदवी देणारे फारसे कोर्स उपलब्धच नसताना, हा कोर्स तेही नामांकित संस्थेतून करता आला. याचं त्यांना समाधान असून तिथे राहून शिकता आलं, याचाही आनंद आहे. त्याचबरोबर केवळ प्रॅक्टिकल आणि फिल्डवरचे अनेक धडे त्यांना व्यक्तीशः अवगत होतेच. पण, या कोर्समुळे त्यांची थिओरेटिकल बाजू भारतीय वन्यजीव संस्थानमध्ये पक्की झाली.
 
‘कम्युनिटी इकोलॉजी’ या विषयामध्ये त्यांना रस निर्माण झाला होता म्हणून त्यांनी बेडकांवर या पद्धतीने अभ्यासही करून त्यावर संशोधन सादर केले. त्याचबरोबर ‘हर्पिटो फौना’ म्हणजेच सरपटणार्‍या प्राण्यांचे त्यांनी सर्व्हे केले असून, त्यावर अभ्यासही केला आहे. यामध्ये अनेक रंजक नोंदी करण्यात आल्या असून, त्यापैकी एक महत्त्वाची नोंद म्हणजे एका सापसुरळीच्या प्रजातीची स्वातंत्र्यानंतर प्रथमच नोंद करण्यात आली. भारतीय वन्यजीव संस्थानामधून त्यांचे ‘मास्टर्स’ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ‘नेचर कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन’मध्ये काम करायला सुरुवात केली. या सर्व काळामध्ये सह्याद्रीमध्ये बर्‍यापैकी फिरणं आणि काम झाल्यामुळे पूर्वांचल वगैरे या भागात अभ्यास आणि संशोधन करण्याची इच्छा होती. अरुणाचल प्रदेशच्या पाके टायगर रिझर्व्हमध्ये जाऊन त्यांनी धनेश पक्ष्यांवर काम केलं. धनेशाच्या घरट्यांचे निरीक्षण (nest monitoring) आणि सर्व्हे यासाठी काम करत त्यांचं धनेश संशोधनाचं काम सुरू झालं.
 
या भागामध्ये धनेशाच्या पाच प्रजाती आढळत असून इतक्या प्रजाती एकत्रितपणे कशा राहतात, यावर त्यांनी संशोधन सुरू केलं आणि २००८ मध्ये त्यांच्या पीएच.डी.ला सुरुवात झाली. यापैकी चार प्रजाती बर्‍यापैकी सामान्य असल्या, तरी त्याबरोबरच फळांच्या बिया पसरविण्यात, त्यामार्फत जंगलनिर्मिती करण्यात धनेशांची भूमिका या सर्व गोष्टींविषयी त्यांनी अभ्यास केला. या संशोधनात्मक अभ्यासामधून नामदफा टायगर रिझर्व्हमध्ये सर्वाधिक धनेशांची संख्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच ‘नारकॉन्डम’ या प्रदेशनिष्ठ धनेशांवरही त्यांनी संशोधन केले आहे. धनेशांना ‘जीपीएस टॅग’ लावण्याचा प्रकल्पही त्यांनी केला असून पाके येथे त्यांनी बीजं पसरवताना किती अंतरावर पसरवल्या जातात, यावरही अभ्यास केला. याबरोबरच सडे, तेथील प्राण्यांचा अधिवास, पक्षी अशा अनेक परिसंस्थांवर त्यांनी संशोधनाचं काम केलं आहे. ते अनेक विद्यार्थ्यांना मास्टर्स आणि पीएच.डी.साठीही मदत करत असून त्यांनी आजवर अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. दुर्मीळ आणि नष्टप्राय प्रजातींचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्व्हे, संशोधन, रिसर्च पेपर असे त्यांचे काम सुरू असून, अनेक नोंदी झालेल्या प्रजातींवर ‘इकोलॉजिकल’ अभ्यास मात्र झालेला नाही. यापैकी काही ‘क्रिटिकली इंडेजर्ड’ अर्थात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींवर अभ्यास करून त्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्नशील आहेत.
 
आजवर त्यांचे ४३ रिसर्च पेपर प्रकाशित झाले असून, २० वर्षांहून अधिक असा प्रदीर्घकाळ पर्यावरणीय संशोधनाचे, संवर्धनाचे काम केले आहे. त्यांचे हे संवर्धनांचे सर्व काम प्रामुख्याने ‘फॉरेस्ट रिस्टोरेशन’ म्हणजेच जंगले पुनरुज्जीवित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. “माझा छंद किंवा मला आवडणार्‍या गोष्टीचे सुदैवाने मला करिअर म्हणून करता येत आहे, याचं खूप मोठं समाधान आहे. त्यामुळेच मला माझं काम काम वाटत नाही तर आनंदच वाटतो,” असं मत ते व्यक्त करतात. संवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेल्या निष्ठावंत आणि सातत्यपूर्ण मेहनती संशोधक डॉ. रोहित नानिवडेकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.