एनआयएच्या तपासानंतर बंगाल पोलिसांकडून अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल!

    09-Apr-2024
Total Views |
nia-has-reached-the-high-court


नवी दिल्ली :     पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोटातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या एनआयएच्या पथकावर हल्ला झाला. हे प्रकरण ताजे असताना सदर हल्ल्यानंतर राज्य पोलिसांनी एनआयए अधिकाऱ्यांवरच महिलांच्या शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी दोन एनआयए अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले असून, खराब झालेले वाहन आणण्यास सांगितले आहे. यानंतर एनआयएने कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी एनआयए टीमने दि. ०६ एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथे पोहोचली होती. यावेळी अधिकाऱ्यांवरच हल्ला करून त्यांच्या वाहनाचे नुकसान करण्यात आले. मात्र, पथकाने सूत्रधार मनोब्रता जाना आणि बलाई चरण मेईतेई या दोघांना अटक केली असून या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता.


हे वाचलंत का? - केजरीवालांना उच्च न्यायालयाने फटकारले, मद्य धोरणात वैयक्तिक सहभाग!


पश्चिम बंगालमध्ये पोलिसांकडून एनआयए अधिकाऱ्यांना समन्स पाठविण्यात आले आहेत. तसेच, एफआयआर रद्द करण्यासाठी तपास यंत्रणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे बॉम्बस्फोटातील आरोपींना पकडण्यासाठी गेल्यानंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एनआयएने हे आरोप फेटाळून लावले आहेत. एनआयएने सांगितले की, त्यांच्या टीमने कोणतेही बेकायदेशीर काम केले नसून बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी एनआयएचे पथक पोहोचले होते.

टीएमसी नेते मनोब्रता जाना यांच्या पत्नीने एनआयए अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. विनयभंग आणि महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याच्या आरोपाखाली हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एनआयए पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भूपतीनगर पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांनी तीन गावकऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. गावकऱ्यांना येत्या दोन ते तीन दिवसांत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.