नवी दिल्ली: ख्रिश्चनधर्मीय मुला-मुलींनी लव्ह जिहादच्या धोक्याविषयी सावध व्हावे, यासाठी केरळमधील एका चर्चने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. देशातील इस्लामी कट्टरपंथियांकडून लव्ह जिहाद आणि त्याद्वारे दहशतवादी कृत्यांसाठी वापर, हे सत्य द केरल स्टोरी या चित्रपटात मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा यांचे या चित्रपटासाठी देशभरात कौतुकही झाले होते. त्याचवेळी मुस्लिम कट्टकपंथी आणि त्यांच्या समर्थकांकडून चित्रपटास विरोधही झाला होता.
नुकतेच केरळमधील ख्रिश्चन संघटनांनी हा चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मुलांना प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या हानींची जाणीव करून देता येईल. केरळच्या सायरो मलबार चर्चच्या इडुक्की डायोसीजने हा चित्रपट दहावी आणि बारावीच्या मुलांना दाखवला. यावेळी त्यांना लव्ह जिहादवरील पुस्तिकाही वाटण्यात आल्या. या पुस्तिकेत मुलींना कसे आमिष दाखवून फसवले जाते, याचीही माहिती देण्यात आली होती. तसेच हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा कसा वेगळा आहे यासाठी त्यांना त्याचे परिक्षणही लिहिण्यास सांगितले होते.
ख्रिश्चन संघटनेचे माध्यम प्रभारी पाद्री जिन्स कराकत यांनी स्पष्ट केले की, दरवर्षी सुट्टीच्या काळात मुलांना विशिष्ट विषयावर कार्यक्रम दाखवले जातात आणि पुस्तके दिली जातात. प्रेमसंबंधांत अडकून मुले अनेकदा जोखीम पत्करतात. त्यामुळे प्रेमात पडणे आणि त्यातून निर्माण होणारे धोके याची त्यांना जाणीव करून द्यायची होती. मुलांना हे अधिक प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी 'द केरळ स्टोरी' त्यांना दाखवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.