पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
टीका, पिलीभीत आणि बालाघाटमध्ये जाहिरसभा तर चेन्नईत भव्य रोड शो
09-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली: काँग्रेसने प्रथम भव्य श्रीराम मंदिरास विरोध केला आणि त्यानंतर श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झालेल्या आपल्या नेत्यांना पक्षातून काढून टाकले. प्रभू रामाचा द्वेष करणे हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पिलीभीत येथील जाहिर सभेत केला.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील पिलीभीत आणि मध्य प्रदेशातील बालाघाट येथे जाहिर सभांना संबोधित केले. त्याचप्रमाणे सायंकाळी तामिळनाडूमध्ये चेन्नईत भव्य रोड शोमध्येही सहभागी झाले होते.
पंतप्रधानांनी यावेळी इंडी आघाडीवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, अयोध्येत भव्य श्रीराममंदिर बांधले जाऊ नये यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले. त्यांनी तर श्रीरामाचे अस्तित्वही नाकारले होते. मात्र, देशातील जनतेने भव्य मंदिराच्या उभारणीसाठी सक्रिय योगदान दिले आणि काँग्रेसचे पाप माफ करून त्यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याची संधी दिली. मात्र, काँग्रेसने निमंत्रण नाकारून प्रभू रामाचा अपमान केला. एवढेच नव्हे तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झालेल्या आपल्या पक्षातील नेत्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टीदेखील केली. त्याचवेळी आता तर काँग्रेसच्या घोषणापत्रावर मुस्लिम लीगचा प्रभाव स्पष्ट दिसून येत आहे. सपा आणि काँग्रेसची इंडी आघाडी देशात विभाजन करत असल्याचाही टोला पंतप्रधानांनी लगाविला.
यंदाची लोकसभा निवडणूक ही परिवर्तनाची असल्याचे पंतप्रधानांनी बालाघाट येथे सांगितले. ते पुढे म्हणाले, आतापर्यंत जे काही काम झाले ते फक्त ट्रेलर आहे. अजून खूप काही करायचे आहे. मोदींचा जन्म मौजमता करण्यासाठी नव्हे तर कठोर परिश्रमासाठी झाला आहे, हे जनतेला ठाऊक आहे. देशासाठी, देशातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदी कष्ट करतच राहणार आहे. आपल्यासाठी संपूर्ण देश हेच कुटुंब आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.
चीनची हिंमत नाही – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आसाममधील लखीमपूर येथे जाहिर सभेस संबोधित केले. ते म्हणाले, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६२ साली चीनच्या आक्रमणावेळी आसाम आणि अरुणाचलला एकटे सोडले होते, हे लोक कधीच विसरणार नाहीत. त्याचवेळी मोदी सरकारच्या काळात देशाच्या एक इंच जमिनीवरही कब्जा करणे चीनला शक्य झालेले नाही. डोकलाममध्ये तसा प्रयत्न करण्यात आला, मात्र मोदी सरकारने तेही हाणून पाडल्याचे गृहमंत्री शाह म्हणाले.