वेंगुर्ला - किनाऱ्यावर अंडी घालत होते कासव; नाका-तोंडात अडकला होता स्टीलचा गळ

    08-Apr-2024
Total Views |
vengurla sea turtle



मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या सागरी कासवाला कासवमित्रांनी जीवदान दिले (vengurla sea turtle). या सागरी कासवाच्या तोंडात मासेमारीचा गळ अडकला होता (vengurla sea turtle). अशावेळी कासवमित्रांनी इजा झालेल्या कासवाच्या तोंडातून गळ काढून प्राथमिक उपचार करुन त्याला पुन्हा समुद्रात सोडले. (vengurla sea turtle)

सध्या कोकण किनारपट्टीवर समुद्री कासवांच्या विणीचा हंगाम सुरू आहे. सागरी कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या दरवर्षी कोकणातील किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येतात. शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास वायंगणी किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची मादी अंडी घालण्यासाठी आली होती. यावेळी कासव संवर्धनाचे काम करणारे कासवमित्र सुहास तोरसकर आणि जयानंद तोरसकर किनाऱ्यावर फिरत होते. अंडी घालण्यासाठी आलेले कासव दिसल्यावर त्यांनी तिचे निरीक्षण केले. यावेळी त्यांना कासवाच्या तोंडात स्टीलचा गळ अकडल्याचे निदर्शनास आले. निरीक्षणाअंती साधारण ३ इंचाचा मासेमारी करण्यासाठी वापरला जाणारा मोठा स्टीलचा गळ आम्हाला कासवाच्या तोंडात अडकलेला दिसल्याची माहिती कासवमित्र सुहास तोरसकर यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. हा गळ कासवाच्या तोंडातून जाऊन नाकावाटे बाहेर आला होता आणि त्याचा त्रास सहन करत मादी कासव अंडी घालत असल्याचे तोरसकर यांनी सांगितले.



कासवाने अंडी घातल्यानंतर तोरसकर यांनी या कासवाला ताब्यात घेतले. नाका-तोडांत हा गळ अडकल्याने ते काढण्याचे काम जोखमीचे होते. अशावेळी दोन्ही कासवमित्रांनी करवती आणि पक्कडीच्या साहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक हा स्टीलचा गळ कासवाच्या तोंडातून काढला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी या कासावाला पुन्हा समुद्रात सोडले. या कासवाने घातलेल्या ६६ अड्यांना कासवमित्रांनी सुरक्षित हॅचरीत हलवले. सध्या या किनाऱ्यावर १२० कासवांची घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासव या बऱ्याच व्याधींनी ग्रस्त असतात. काहींच्या कवचावर बार्नेकल चिकटलेले असतात, तर काही कासवांचे पर तुटलेले असतात. बऱ्याचदा किनाऱ्यावर बसून गळाच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. अशाच एका गळात अडकलेला मासा खाण्यासाठी ही मादी कासव त्याठिकाणी आली असावी. अशावेळी मासा खाताना तिच्या तोडांत हा गळ अडकल्याची शक्यता आहे.