ममता बॅनर्जी यांची तालिबानी प्रवृत्ती

    08-Apr-2024
Total Views |
NIA team attacked

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३५ जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांनी भाजपला रोखण्यासाठी, ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला घडवून आणला का, हा प्रश्न आहे. हिंसाचाराला बळ देणारी, ममता बॅनर्जी यांची तालिबानी प्रवृत्तीच यामागे आहे. संदेशखाली प्रकरणातील शाहजहान शेख याला पाठीशी घालणार्‍या, ममता बॅनर्जी याच होत्या. आता बॉम्बस्फोटातील आरोपींची पाठराखण त्या करत असल्याचे दिसून येते.

पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगर येथे २०२२ मधील बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी जाणार्‍या ‘एनआयए’च्या पथकावर जमावाने हल्ला केल्यानंतर, आता पोलिसांनी या ‘एनआयए’ पथकासोबतच ‘सीआरपीएफ’च्या अधिकार्‍यांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ‘एनआयए’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असून, जमावाने पथकावर केलेला हल्ला हा अकारण असल्याचेही ‘एनआयए’ने म्हटले आहे. बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, हे येथे समजून घेतले पाहिजे. म्हणूनच ममता बॅनर्जी म्हणताहेत की, पोलिसांना न सांगता, ‘एनआयए’चे पथक गेले म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला. बंगालचे पोलीस म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या हातातली कठपुतळी असल्याचे, संदेशखाली प्रकरणातून सिद्ध झालेले आहेच. त्यातील आरोपी शाहजहान शेख हा पोलिसांना सापडतच नव्हता.

ममता बॅनर्जी यांनी आता असा कांगावा केला आहे की, ‘एनआयए’नेच हा हल्ला घडवून आणला असून, या छाप्याच्या वेळेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच ‘एनआयए’च्या अधिकार्‍यांनी भूपतीनगर गावातील महिलांच्या घरात घुसून, त्यांच्यावर अत्याचार केला, असा आरोपही त्यांनी केला आहे. ‘एनआयए’ने आपल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात कोणतीही गैरवर्तणूक झाली नसल्याचे स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. बॉम्बस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्याच्या तपासाचा एक भाग म्हणून ‘एनआयए’ आपली कारवाई प्रामाणिक, कायदेशीर आणि पुरेशा गांभीर्याने बजावत असल्याचे नमूद केले आहे. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात पीएस भूपतीनगरमधील नेरुआबिला गावात २०२२ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तिघांचा मृत्यू झाला होता. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, दि. ६ जून २०२३ रोजी ‘एनआय’ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता.‘एनआयए’च्या पथकावर करण्यात आलेला हल्ला हा बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास रोखण्यासाठी, पश्चिम बंगाल सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. संदेशखालीतही अशाच पद्धतीने ‘ईडी’च्या पथकाला तृणमूल काँग्रेसकडून मारहाण करण्यात आली होती. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलच्या सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

निवडणुकीपूर्वी भाजप प्रत्येक विरोधकाला अटक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही ममता यांनी केला. भाजपच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी यांनी दोन दिवसांपूर्वी कूचबिहारमध्ये एका प्रचारसभेत संबोधित करताना, ‘एनआयए’विरोधात हिंसा भडकावणारी वक्तव्ये केल्यानंतरच हा हल्ला झाला. म्हणजेच ममता बॅनर्जी हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठीच येथे आल्या होत्या. तृणमूल काँग्रेसच्या तालिबानी मानसिकतेचा हा पुरावा आहे, असे भाजपने म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांची मानसिकता तालिबानी असून, त्यातूनच राजकीय हिंसाचार, केंद्रीय तपास यंत्रणांवर करण्यात येणारे हल्ले असे प्रकार घडून येत आहेत. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि धर्मांधांना पश्चिम बंगालमध्ये राजाश्रय मिळाला आहे, हा भाजपचा आरोप आहे.पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीवेळी घडून येणारा हिंसाचार हे सर्वात मोठे आव्हान आहे. म्हणूनच तेथे मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी, भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरी भेट दिली पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. संदेशखालीप्रकरणात देखील महिलांवरील अत्याचाराकडे ममता बॅनर्जी सरकारने दुर्लक्ष केले होते.

अखेर न्यायालयाच्या आदेशानंतरच, शाहजहान शेखला अटक झाली. निवडणूक आयोगाने आता पश्चिम बंगाल सरकारला गेल्या वर्षीच्या पंचायत निवडणुकीतील हिंसाचाराच्या घडलेल्या घटनांचा तपशील लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निरीक्षकांना सादर करण्याचा आदेश दिला आहे.पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीमुळेच तेथे सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी आयोगाच्या या निर्णयाविरोधातही नाराजी व्यक्त केली होती. आम्हाला विश्वासात घेतले नाही, अशी त्यांची तक्रार होती. बंगालमध्ये डाव्यांची जेव्हा राजवट होती, तेव्हापासूनच तेथील प्रत्येक निवडणूक ही रक्तरंजित झाली आहे. विशेषतः पंचायत निवडणुकीत होणारा हिंसाचार चिंताजनक असाच आहे. २००३ मधील पंचायत निवडणुकीत ७६ बळी गेले. २००८ मध्ये डाव्यांनी तृणमूल काँग्रेसला पराभूत केले, तेव्हाही हिंसाचार घडवून आणला गेला. २०१३ मध्येही पंचायत निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराने ३९ बळी नोंदवले. २०१८ मतदानाच्या दिवशी १२ तर एकूण २९ ठार झाले.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत तृणमूल २२ जागांवर विजयी ठरली. भाजपने १८ जागा जिंकत, तृणमूलला चकित केले.आता भाजपने तेथे ३५ जागांवर विजयी होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दि. २ मे २०२१ रोजी विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभर हत्या, बलात्कार आणि चकमकी घडवल्या गेल्या. कोलकाता उच्च न्यायालयाने ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले होते. पंचायत निवडणुकीदरम्यान ५० पेक्षा जास्त बळी गेले. यात भाजप कार्यकर्ते, नेते यांच्यावर सर्वाधिक हल्ले नोंदवले गेले. या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये विशेषतः ग्रामीण भागात भाजपचा जनाधार वाढलेला दिसून आला. भाजपला रोखण्यासाठी तृणमूल पुन्हा एकदा हिंसाचाराचा मार्ग अवलंबण्याची भीती व्यक्त होत आहे. नेत्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांना झालेली अटक ही ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढवणारी बाब ठरली असल्यानेच, ‘एनआयए’विरोधात जाण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी चिथावणी दिली आहे का, असा प्रश्न आहे.