...अन् त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलला!

    07-Apr-2024   
Total Views |
Smita Phatak Dombivli


बहुविकलांगाना मायेची सावली देत, त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवित, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धडपडणार्‍या, डोंबिवलीकर स्मिता सुधाकर फाटक यांच्याविषयी...

स्मिता यांचा जन्म डोंबिवलीचा. त्यांनी डोंबिवलीतील स. वा. जोशी शाळेतून शिक्षण पूर्ण केले. स्मिता यांना अभ्यासापेक्षा खेळात जास्त रुची होती. त्यामुळे बारावीनंतर त्यांनी पुढील शिक्षणाचा फारसा विचार केला नाही. त्यांची आई नलिनी घुले यांनी डोंबिवलीत बालविकास मंदिर या शाळेची स्थापना केली होती. ही शाळा डोंबिवलीत ’घुले बाईंची’ शाळा म्हणून प्रसिद्ध होती. त्यांचे वडील नारायण घुले यांनी बालविकास मंदिराचे प्रशासकीय कामकाज उत्तमरित्या सांभाळून, पत्नीला साथ दिली. घुले आकाशवाणी मुंबईचे रेडिओ स्टार शास्त्रोक्त संगीताचे गायक म्हणून त्याकाळी सुपरिचित होते. तसेच रेल्वेत नोकरीही त्या करत होते. आई-वडिलांमुळे समाजसेवेचे भान आणि संगीताची आवड व जाण हे गुण स्मितामध्ये देखील आले होते. आई-वडिलांकडून त्यांना ज्ञानदानाचा वारसा लाभला होता.

स्मिता यांना नोकरी करायची होती. पण, आईंनी शाळा काढली असल्यामुळे, स्मिता यांनी शाळेच्या कामकाजात हातभार लावावा, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. स्मिताला मात्र नोकरी करायची होती. त्यांनी हट्टाने नोकरी करण्यास सुरुवात केली. १९७०-७२ मध्ये स्मिता यांनी ठाण्यात एका कंपनीत, स्टेनोग्राफर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी सचिवालयात एक वर्ष स्टेनोग्राफर म्हणून नोकरी केली. स्मिता १९७३ला विवाहबद्ध झाल्या. स्मिता यांचे पती सुधाकर फाटक मफतलाल इंजिनिअरिंगमध्ये संगणक विभागात कार्यरत होते. विवाहानंतर त्यांनी आठ वर्षे शिक्षिकेची नोकरी केली. पुढील ३० वर्षं घरगुती शिकवणूमधून अर्थार्जन केले. निवडक माहिती कात्रण यांच्या स्वरुपात जतन करणे, संगीत ऐकणे आणि फिरणे याशिवाय काही थोडाफार लिखाण करण्याचाही त्यांना छंद आहे. हे सगळे छंद त्या जोपासत असल्या, तरी समाजकार्य हा त्यांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे.

१९९०च्या सुमारास ‘ठाणे पीपल्स’ ही आठ शाखा असलेली बँक बंद झाली. तिचे रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी, जी कृती समिती स्थापन झाली होती, त्यामध्ये स्मिता यादेखील होत्या. एक ते दीड वर्षं अविश्रांत धडपड करून, शेवटी या बँकेचे ’रुपी बँके’त विलीनीकरण करण्यात आले. कृती समिती यशस्वी झाली. स्मिता यांच्या समाजसेवेच्या पुढच्या उपक्रमांची ही नांदीच म्हणता येईल.

संवाद प्रबोधिनी या मूकबधीर शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्याची धुरा स्मिता यांनी हाती घेतली. ही जबाबदारी त्यांनी तीन वर्ष सांभाळली. मूकबधीर मुलांचे कार्यक्रम बसविणे ही गोष्ट आव्हानात्मक होती. त्यासाठी तीन महिने आधी त्या तयारी सुरू करत असत. मुलांकडून चांगला सराव करून घेऊन ही, मुले ऐन कार्यक्रमात आपली कला सादर करतील की नाही, याबाबत देखील शाश्वती नसते. पण, त्यामुळे मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो. हेच आपल्या कामाचे समाधान असल्याचे, स्मिता सांगतात. खोणी येथील मतिमंद मुलांसाठी निवासी सोय असलेली घरकुल संस्था आहे. स्मिता या घरकुल संस्थेच्या विश्वस्तपदी गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहेत.

घरकुलमधील मुलांचे कार्यक्रम बसविणे, त्यांच्याकडून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून घेणे अशा गोष्टी त्या प्रेमाने आणि चिकाटीने करत असत. स्मिता यांनी खिडकाळी वृद्धाश्रम डोंबिवली, कमलधाम वृद्धाश्रम अंबरनाथ, स्नेहबंधन वृद्धाश्रम आणि आनंददायी वृद्धाश्रम जांभूळपाडा यांसारख्या संस्थांना स्मिता यांनी भेट दिली आहे. या संस्थांचा दिनक्रम आणि त्या ठिकाणी काम करण्याची पद्धती कशी आहे, कामांचे नियोजन कोणत्या पद्धतीने केले जाते, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या अनुकरणीय गोष्टीचा आपल्या उपक्रमात समावेश करता येईल का? याचा मागोवा त्या घेत असतात.

स्मिता या सगळ्या कामासोबतच डोंबिवलीत हेव्हन बहुविकलांग स्कूलसाठी काम करतात. हेव्हन स्कूलच्या संचालिका स्मिता कीर्तने या आहेत. कीर्तने यांनी स्मिता फाटक यांना हेवन स्कूलमध्ये काम करण्याबाबत प्रस्ताव दिला. त्यांच्या कामाचा अनुभवाचा शाळेला फायदा होईल, या हेतूने त्यांनी स्मिता यांना संधी दिली. स्मिता हेव्हन स्कूलमध्ये सल्लागार पदावर कार्यरत आहेत. आता दोघीही शाळेची धुरा लीलया पेलत आहे. जीवनात काही गोष्टी मागण्यापेक्षा देण्यात अधिक महत्त्व असते. हे जीवनाचे मर्म स्मिता आणि त्यांच्या शिक्षकवृदांनी जाणले आहे. स्मिता मुलांना आणि पालकांना आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे.

स्मिता यांना श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे विशेष पुरस्कार, ’डोंबिवलीकर पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार म्हणजे स्मिता यांना त्यांच्या कार्याची दिलेली एक पोचपावतीच म्हणावी लागेल. स्मिता यांचे कार्य समाजातील अनेकांना प्रेरणा देणारे आहे. बहुविकलांगासाठी मायेची सावली झालेल्या, स्मिता यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी
दै. ‘मुंबई तरूण भारत’ यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा!