नवप्रेरणांच्या तेजस्वी बहर कळ्या...

    06-Apr-2024
Total Views |
bharat election mood chhatrapati shivaji maharaj


विश्वातील सर्वात मोठ्या  लोकशाहीचा अमृतकाल महोत्सव सुरू असतानाच, देश एका नव्या नेतृत्वासाठी निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात आहे. आजच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, उमेदवार, प्रचारसभा यांचे भयावह चित्र आपण प्रत्यक्ष पाहतच आहोत. यातून देशात खूप धन आहे; पण मानवधन मात्र नाही, याचा प्रत्यय येतो. म्हणूनच मग
महात्मा खरा जो स्वधर्माभिमानी परी
धर्मवेडास थारा न दे
समत्वें गुणग्राहकत्वेंच योजी स्वकीयांस जो राष्ट्रकार्यामधे
सदा वंद्य जो क्षात्रकर्मप्रणेता महाराष्ट्रसम्राट शिवाजी प्रभू
यांचे स्मरण करावेच लागेल. शिवरायांचे खरे मानवधन बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद, तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, मुरारबाजी देशपांडे, जीवा महाला असे आता तयार व्हायला हवे. आताच्या प्रक्षोभक जनतेच्या डोळ्यातील वाळवंट पुसून, तेथे पेटायला हव्यात. शिवरायांच्या कर्तृत्वाच्या, निष्ठेच्या अन् नवप्रेरणांच्या तेजस्वी बहर कळ्या म्हणूनच हा लेखप्रपंच.

दि. २८ मार्च ही छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. पण, माझ्या मनात नेहमी प्रश्न येतो, या मातीत अनेक राजे होऊन गेले; पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, पुण्यतिथी, राज्याभिषेक दिन ज्या उत्साहात व आनंदात साजरा करतो, त्यामागे नक्की काय कारण असेल? तेव्हा माझ्या लक्षात येते की, आपल्याला म्हणजे महाराजांच्या मावळ्यांना त्यांचं अपूर्ण कार्य पूर्ण करावयाचे आहे, याचे भान व याची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. महाराजांनी आपल्याला एक भव्यदिव्य स्वप्न दाखवले. राज्याभिषेकाने त्या स्वप्नाच्या पूर्णत्वाला सुरुवातही झाली होती. पण, दुर्दैवाने महाराज अल्पायुषी ठरल्याने, स्वप्न अपूर्ण राहिले. आज ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक लोकोत्तर महापुरूष होते. त्यांच्या जीवनाचा अभ्यास केल्याने, आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मला जाणवलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माणसाने मिळणार्‍या यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने खचूनही जाऊ नये. उदा. अफजलखानाचा वध झाल्यानंतर, महाराजांनी विजय उत्सव साजरा करण्यात, एक क्षणाचाही वेळ वाया घालवला नाही. याउलट आदिलशाही प्रदेशावर चहू दिशांनी आक्रमणे केली. अफजलखानाच्या सैन्याची वाताहत झाली. खानाच्या सैन्याला सर्व युद्ध साहित्य, हत्ती, घोडे, तोफा, संपत्ती व इतर साहित्य टाकून जीव मुठीत धरून पळत सुटावे लागले. हिंदवी स्वराज्यासाठी प्रचंड साहित्य व संपत्तीही मिळाली. शक्य तितक्या दूरवर आदिलशाही प्रदेशात मराठी फौजा शिरल्यात आणि तो प्रदेश त्यांनी पादाक्रांत केला.

प्रतापगडाच्या पायथ्याशी लढल्या गेलेल्या, या लढाईचा उल्लेख जगातील सर्वोत्कृष्ट १२ लढायांमध्ये होतो. या उलट आग्य्राच्या काळकोठडीत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांना या गोष्टीची जाणीव होती की, औरंगजेब बादशाह आपल्याला सहजासहजी सोडणार नाही. मी जर इथेच अडकून पडलो, तर हाती घेतलेले हिंदवी स्वराज्य निर्मितीचे कार्य पूर्ण होऊ शकणार नाही. मला कोणत्याही परिस्थितीत इथून बाहेर पडणे क्रमप्राप्त आहे. अशा बिकट परिस्थितीत मनाला अत्यंत शांत व स्थिर ठेवत त्यांनी बादशहाच्या हातावर तुरी देऊन, तेथून अतिशय शिताफीने स्वतःची सुटका करून घेतली. त्याची बादशाहालाही भनक लागली नाही. थोडक्यात, महाराज यशाने हुरळून किंवा अपयशाने खचून जात नसत. याची अनेक उदाहरणे महाराजांच्या जीवनचरित्रात येतात. अफजलखानाच्या भेटीस जाताना, त्यांची पत्नी सईबाई आजारी होत्या. पण, त्यांनी कधीही स्वराज्य निर्मितीच्या कामात कौटुंबिक समस्यांना, अडीअडचणींना प्राधान्य दिले नाही. म्हणूनच तर त्यांना ’आधी लगीन कोंढाण्याचे मगच माझ्या रायबाचे’ असे सांगणारे, तानाजी मालुसरे सारखे शिलेदार मिळाले.

महाराजांजवळ उपजत अनेक गोष्टी होत्या. त्यातीलच एक म्हणजे, त्यांचे कौशल्यपूर्ण बोलणे अतिशय मधाळ व रसाळ होते. त्यात एक गोडवा होता. आपलेपणाची व आपुलकीची भावना होती. त्यांच्या बोलण्याची भुरळ पडली नाही, असा माणूस विरळच. याचाही अनुभव आपल्याला शिवचरित्रात पदोपदी येतो. खरं तर हा गोडवा आपणही सर्वांनी स्वीकारायलाच हवा. त्यामुळे आपले जीवन उजळून निघायला निश्चितच मदत होईल. स्वराज्यातील बर्‍याच घटना या आजही आपल्याला अचंबित करणार्‍या वाटतात. त्यामागे महाराजांचे विलक्षण कौशल्यपूर्ण बोलणे, वागणे आणि चालणे हेच कारणीभूत होते. आपल्या सभोवतालच्या माणसांवर मग तो शत्रू असो की मित्र, महाराजांची छाप पडली नाही, असे कधी झाले नाही. ज्याला आपण साखर पेरणी असे म्हणू शकतो. महाराजांना औरंगजेबाच्या कैदेत असताना, या साखर पेरणीचा पुरेपूर उपयोग झाला. असे आज अनेक इतिहासकारांच्या अभ्यासात स्पष्ट होत आहे. एवढेच नाही तर महाराज राजगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी खुद्द औरंगजेबालाच साखर पेरणी करणारे असे पत्र पाठवले की, ’इकडे काही महत्त्वाची कामे खोळंबली असल्या कारणाने आपली परवानगी न घेताच यावे लागले, येथे मी आपलेच काम करत आहे काळजी नसावी.’ त्यामुळेच तर पकडलेल्या मावळ्यांना औरंगजेबाने सोडून दिले. महाराजांवरील शोध प्रक्रियाही त्याला थांबवावी लागली. त्यामुळे संभाजी महाराजांचे घरी येणे सुकर झाले.

ही सर्व गोष्ट मी एका वाक्यात सांगायची म्हटली, तर महाराजांनी दिल्लीला जाताना जितके आपले सहकारी, उंट, घोडे, हत्ती सोबत नेले होते, ते सर्व परत आणण्यात महाराज यशस्वी झालेत. हे केवळ आणि केवळ महाराजांच्या साखर पेरणीमुळे शक्य होऊ शकले. याचा अर्थ असाही नाही की, महाराज फक्त साखर पेरणीच करत होते. महाराजांचा कणखरपणा आपल्याला त्याच औरंगजेबाच्या दरबारात दिसून येतो. दरबारात आपल्यासमोर आपल्याला पाठ दाखवून पळालेल्या, जसवंत सिंगला आपल्या पुढच्या रांगेत बघितल्यानंतर महाराज भर दरबारात रामसिंगाला आवाज देऊन बोलवतात - “रामसिंग, ये हमारे सामने कौन खडा हैं, जो हमे पीठ दिखा कर रणांगण से भाग खडा हुआ था।” दिल्ली दरबारात इतक्या उंच आवाजात बोलण्याची त्यावेळी मुभा नव्हती. महाराजांची नाराजी दूर करण्यासाठी, प्रथम काही खिल्लत बादशहाकडून अदा केली गेली. महाराजांनी ती खिल्लतसुद्धा भर दरबारात उधळून लावली. याचाच अर्थ महाराज औरंगजेबाला अजिबात घाबरले नव्हते. याउलट आज इतिहास संशोधकांना असे दिसून येते की, महाराजांनी पुरंदरचा तह इतक्या विचारपूर्वक केलेला होता की, त्या तहामध्ये मुघल साम्राज्याच्या उद्ध्वस्ततेची पाळंमुळं रोवली गेली होती. पुढे घडलेही असेच.

महाराजांच्या अखंड जीवनाचा अभ्यास करताना, आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतात आणि त्या गोष्टी आपल्याला शिकवूनही जातात. महाराज कधीही इरेला पेटले नाहीत. म्हणजेच इस पार किंवा उस पार अशी लढाई त्यांनी कधी केली नाही. मात्र, त्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासंदर्भातील उद्दिष्ट निश्चित होते. त्यांना आक्रमकांच्या उद्दिष्टांचेही योग्य आकलन झालेले होते. आपल्या उद्दिष्टांशी सतत बांधिलकी बाळगत, काळाच्या गरजेनुसार हव्या त्या तडजोडी त्यांनी बिनदिक्कतपणे केल्या आणि वेळ येताच त्या मोडूनही टाकल्या. त्याची कधी त्यांनी तमाही बाळकली नाही. उदाहरणार्थ, विजापूरचा सरदार अफजलखान याने भर दरबारात ’शिवाजीस मी चढे घोड्यानीशी जीवंत अथवा मृत घेऊन येण्याचा’ विडा उचललेला असताना, तो आता इरेला पेटला आहे, याची जाणीव महाराजांना झाली. महाराजांनी मात्र अतिशय सावध पवित्रा घेत, स्वतःला सुरक्षित केले. आपल्या वकिलाच्या माध्यमातून त्यांनी अफजलखानासमोर आपली साखर पेरणी सुरू केली. त्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक चालीत आपण फसत चाललो आहोत, याची खानाला भनकही आली नाही. केवळ या साखर पेरणीमुळेच प्रचंड सैन्य घेऊन आलेला, अफजलखान केवळ दहा साथीदारांसह प्रतापगडाच्या पायथ्याशी येण्यास तयार झाला.

हे महाराजांच्या बुद्धी कौशल्य, शब्दकौशल्य व त्यात असणार्‍या साखर पेरणीचे उत्तम उदाहरण आहे. आपणास ती आत्मसात करायला हवी. हे महाराज आपल्याला शिकवतात. दुर्दैव असं की, आपण ते समजून घेत नाही. बघा नेमकं काय झालं, प्रचंड फौज घेऊन निघालेल्या अफजलखानाच्या सैन्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी येईपर्यंत आपलं सैन्य अनेक ठिकाणी विभागून ठेवावं लागलं. सैन्य विभागले गेल्यामुळे अर्थातच त्याचं बळ कमी झालं. महाराजांनी याचं पूर्ण नियोजन आपल्या मनात आधीच असल्याप्रमाणे केलेले दिसून येते. जावळीच्या जंगलात दर्‍या-खोर्‍यात समूहासमूहाने लपून बसलेले मावळे तोफांचे बार होताच, म्हणजेच अफजलखानाचा वध होताच, खानाच्या सैन्यावर चहू बाजूने तुटून पडले, त्या संपूर्ण कालखंडामध्ये खानाचे सैन्य याच विचारात होते की, आता युद्ध करण्याची गरजच नाही. अशा गाफील सैन्यावर अचानक हल्ला झाल्यामुळे, त्यांची पळता भुई थोडी झाली. महाराजांकडे अत्यंत अल्प सैन्य असतानासुद्धा नियोजनबद्ध केलेल्या कामामुळे त्यांना प्रचंड मोठ यश मिळाले.

महाराजांनी राज्याभिषेकाची वेळसुद्धा किती विचारपूर्वक शोधली, हे आपल्या लक्षात येते. १६७४चा जून महिना म्हणजे पावसाळ्याचा महिना. त्या काळात या महिन्यात कोणीच मोहिमा आखत नसत. त्यामुळे परकीय आक्रमणाची अजिबात भीती नव्हती, तरीही महाराजांनी राज्याभिषेकाच्या कालखंडामध्ये आपल्या सर्व किल्लेदारांना किल्ल्यावर चोख बंदोबस्त व डोळ्यात तेल घालून पहारा करण्यास सांगितले होते. इतका प्रत्येक गोष्टीचा अभ्यास महाराज करत असत. मित्रांनो, आज आपण आपले जीवन जगताना, या गोष्टींचा विचार करणे नुसतेच आवश्यक नाही, तर ती आजच्या काळाची गरज आहे. आपल्या विकासासाठी आपलं काम प्रामाणिकपणे करणे म्हणजे ते केवळ आपलंच काम असतं, असं अजिबात नाही. आपण आपलाच विकास करतो म्हणजे तो केवळ आपलाच विकास असतो, असं अजिबात नाही. अशी एक कल्पना करा की, या देशातल्या प्रत्येक नागरिकाने आपलं काम प्रामाणिकपणे, नेटाने आणि व्यवस्थित केले. अशा प्रकारे व्यवस्थित काम करून स्वतःचा उत्कर्ष साधला, तर हा देश विकसित राष्ट्र व्हायला कितीसा वेळ लागेल? अस ज्या-ज्या देशात घडतं, ती सर्वच राष्ट्रे विकसित राष्ट्र होतात. हेच महाराजांनी आपल्याला सांगितले. दुर्दैवाने आपण ते नियमितपणे विसरतो.

देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्या प्रत्येकामुळे एकेका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबांनी त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा देश उद्या आत्मनिर्भर होऊन, जगात विश्वगुरू होईल, यात शंकाच नाही. कर्तव्यदक्ष माणसांमधूनच कामाला शिस्त येईल. प्रत्येकाने देशासाठी एकच केले पाहिजे. देशाच्या विकासासाठी जो बदल व्हावा, असे मनापासून वाटते, सर्वप्रथम तो बदल स्वतःमध्ये करा. मी माझे कर्तव्य नीट करणार आहे. असे वर्तन करणारी जी थोडी माणसे या देशात आहेत, तीच देशाचे भवितव्य घडवतील, यावर माझा ठाम विश्वास आहे. अशा देशभक्तांची मांदियाळी उभी राहील. एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ’नवप्रेरणांच्या तेजस्वी बहर कळ्या’ हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझे हे वैचारिक मंथन मानवी जीवनाच्या आनंददायक प्रगतीसाठी आवश्यक, पण आज प्रतिकूल परिस्थितीत असणार्‍या प्रत्येक गोष्टीच्या विकासासाठी संजीवनी ठरावे, हीच अपेक्षा.

प्रा. प्रशांत शिरुडे
(लेखक के. रा. कोतकर माध्य. उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे शिक्षक आहेत.)
९९६७८१७८७६