सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरही महाविकास आघाडीचा तिढा कायम आहे. काँग्रेस आणि उबाठा या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा करण्यात येत आहे. यातच आता काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी या जागेबाबत दिल्ली येथे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली.
माध्यमांशी संवाद साधताना विश्विजित कदम म्हणाले की, "जनावरंसुद्धा सांगू शकेल की, सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा जिल्हा आहे. संजय राऊत काय म्हणतात यावर टीका टिपण्णी करण्याची मला आवश्यकता नाही," असा टोला त्यांनी लगावला.
"स्वर्गीय वसंतदादांपासून तर गुलाबराव पाटील, पतंगरावर कदम या सगळ्या नेतृत्वाने सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रात मोठं काम केलं. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे. म्हणूनच आज विशाल पाटील यांच्या रुपाने आम्ही सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षासाठी उमेदवार दिलेला आहे. महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि भुगोल माहिती आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "कुणीही परस्पर काहीही ठरवले असेल तर ते आम्हाला मान्य नाही. महाविकास आघाडीमध्ये एकत्रित ठरवून काँग्रेस पक्ष जे आम्हाला सांगेल ते आम्ही मान्य करु. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. याचा अर्थ कुणी कुणाला कमी लेखावं असा नाही," असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी सांगली लोकसभेसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, यावरून काँग्रेस पक्षात नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली असून आता ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांचीही भेट घेणार आहेत.