सांगलीच्या बदल्यात 'उबाठा'कडून काँग्रेसकडे १०० कोटींची मागणी!

भाजप आ. नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

    06-Apr-2024
Total Views |
Sangli UBT Group inc candidate


मुंबई :    
सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात तणाव सुरू असतानाच, ही जागा सोडण्याच्या मोबदल्यात उबाठा गटाने काँग्रेसकडे १०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी शनिवार, दि. ६ एप्रिल रोजी केला. किंबहुना संजय राऊतांचा सांगली दौरा हा त्यासाठाच असल्याचा दावाही त्यांनी केला.




नितेश राणे म्हणाले, "पुण्यातील एका काँग्रेसच्या नेत्याचा मला आज सकाळी फोन आला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही मागे घेतो; पण आम्हाला १०० कोटी द्या, असा प्रस्ताव मातोश्रीवरून पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत दबाव टाकण्यासाठी, काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राऊतांचा दौरा सांगलीमध्ये सुरू आहे", असा दावाही राणे यांनी केला.


उबाठाने खुलासा करावा!

"चंद्रहार पाटलांना वाटत असेल की भांडुपचा देवानंद माझ्यासाठी सांगलीमध्ये आला आहे, पण खरे तर जो व्यवहार उद्धव ठाकरे करण्याचा प्रयत्न करताहेत, त्यासाठी संजय राऊत तिकडे गेला आहे. ही माहिती खरी की खोटी याची माहिती संजय राऊत किंवा त्याच्या मालकाने द्यावी. काँग्रेस कुठल्याही परिस्थितीत अशा कोणत्याही मागणीला होकार देणार नाही म्हणून त्यांच्यावर जास्त दबाव टाकला जात आहे", असा आरोप नितेश राणे यांनी केला.