ममताराजमध्ये तपास यंत्रणांवर हल्ला; तृणमूलच्या नेत्यावर होता बॉम्बस्फोटाचा आरोप!
06-Apr-2024
Total Views |
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूरमध्ये एनआयएच्या (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) पथकावर हल्ला करण्यात आला आहे. पूर्व मिदनापूरमधील भूपतीनगरमध्ये दि. ६ एप्रिल रोजी ही घटना घडली, जिथे एनआयए २०२२ च्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासासाठी गेली होती. राज्याच्या सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस च्या एका नेत्यावर या प्रकरणात आरोप आहे, तपास यंत्रणेचे पथकावर हल्ला करण्यात आला. एनआयए पथकाच्या गाडीवर विटा फेकण्यात आल्याने कारच्या खिडकीचे नुकसान झाले.
ही घटना पहाटे साडेपाच वाजता घडली. तसेच एक अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. याआधी ही दि. ३ डिसेंबर २०२२ रोजी भूपतीनगरमध्ये स्फोट झाला होता. ज्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात एनआयएने याप्रकरणी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या आठ नेत्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. दरम्यान भाजपच्या दबावाखाली एनआयए काम करत असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
या नेत्यांना दि. २८ मार्च रोजी न्यू टाऊन परिसरात हजर राहण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी समन्सला केराची टोपली दाखवली. या सगळ्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप टीएमसी नेते कुणाल घोष यांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी रेशन घोटाळ्यात सहभागी असलेल्या शाहजहान शेखला अटक करण्यासाठी गेलेल्या ईडी (अंमलबजावणी संचालनालय) पथकावर पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे हल्ला झाला होता. पाठोपाठ संदेशखाली येथील वनवासी समाजातील महिलांचे शाहजहान शेख आणि त्याच्या साथीदारांनी लैंगिक शोषण केल्याचे ही उघड झाले होते.
दरम्यान आता छापेमारीच्या वेळी शोध मोहीम राबवत असताना एनआयएच्या पथकावर पुन्हा हल्ला झाला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, स्थानिक पोलीस ठाण्याला छाप्याबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती, परंतु योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. यानंतर एनआयएच्या पथकाने बॅकअपला बोलावले. तपास यंत्रणेने मानवेंद्र जाना आणि अज्ञात लोकांविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नारायबिला गावात झालेल्या स्फोटाप्रकरणी माबवंदर जानाला अटक करण्यासाठी एनआयए पोहोचले होते.